अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सावंतवाडीचे तहसीलदार म्हात्रे यांना निवेदन
सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येला २० ऑगस्ट २०२१ या दिवशी ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण होऊन ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागील सूत्रधार कोण आहेत ?’ हे ‘सीबीआय’ने (केंद्रीय अन्वेषण विभागाने) शोधून काढले पाहिजे अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही. त्यामुळे या हत्येमागील सूत्रधारांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने एका निवेदनाद्वारे येथील तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे करण्यात आली आहे. या वेळी डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, महेश परूळेकर, वासंती परूळेकर, अमोल कदम, नंदकुमार पाटील उपस्थित होते.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की…
१. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित आरोपी म्हणून ‘सीबीआय’ने वर्ष २०१६ मध्ये वीरेंद्र तावडे यांना, ऑगस्ट २०१८ मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना, मे २०१९ मध्ये संजीव पुनाळेकर अन् विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. (२० ऑगस्ट २०१३ मध्ये ज्या पिस्तुलाने डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली, ते पिस्तूल अन्य अन्वेषण यंत्रणांनी अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याच्या प्रकरणी त्याच दिवशी मुंब्रा येथे कह्यात घेतले होते. या प्रकरणी पोलिसांनी खंडेलवाल आणि नागोरी यांना अटक केली होती. हे सत्य अंनिसवाले का सांगत नाहीत ? यावरून अंनिसवाल्यांचा दांभिकपणा दिसून येतो ! – संपादक)
२. ‘सीबीआय’ने अजूनही ३ संशयित आरोपींच्या विरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट केलेले नाही. (अन्वेषण यंत्रणा वारंवार आरोपींची नावे पालटत आहे. त्यामुळे अन्वेषण यंत्रणांवरील विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह आहे ! – संपादक)
३. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चारही हत्यांचे एकमेकात गुंतलेले धागेदोरे अन्वेषण यंत्रणांनी उकलले आहेत. या गुन्ह्यांतील काही संशयित आरोपी समान आहेत, तसेच २ समान शस्त्रे या ४ हत्यांमध्ये वापरलेली आहेत.
४. बेंगळुरू येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालानुसार डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्यावर एकाच बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या शस्त्रविषयक अहवालानुसार कॉ. पानसरे यांच्या हत्येसाठी वापरलेले एक पिस्तूल प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येसाठीसुद्धा वापरले आहे. (कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या फेब्रुवारी २०१५ मध्ये झाली. वर्ष २०१३ मध्ये डॉ. दाभोलकरांच्या हत्येच्या वेळी वापरलेले पिस्तूल कॉ. पानसरे यांच्या हत्येसाठी वापरले गेले, असा दावा पोलिसांकडून केला जात आहे. जर ते पिस्तूल सीबीआयच्या कह्यात होते, तर ते कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या आदल्या दिवशी कोल्हापुरात कसे आले ? ते वापरून परत सीबीआयच्या कह्यात कसे काय गेले ? हे प्रश्न अंनिसवाल्यांना का पडत नाहीत ? अन्वेषण यंत्रणांनी न्यायालयातील खटला लांबणीवर टाकण्यासाठी ‘शस्त्रांचा अहवाल स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडून मागवण्यासाठी वेळ द्यावा’, अशी मागणी केली. त्यावर उच्च न्यायालयाने तशी अनुमती दिली. प्रत्यक्षात पिस्तुलाचा अहवाल स्कॉटलंड यार्डमधून कधी मागवलाच गेला नाही; कारण त्यांच्या समवेत भारताचा तसा करारच नाही. त्यानंतर महाराष्ट्रातील ठाणे येथील खाडीत पिस्तुलाचे तुकडे टाकण्यात आले, असा कयास यंत्रणेने केला आणि त्याचे अन्वेषण करण्यासाठी कोट्यवधी रुपये व्यय करून ठाण्याच्या खाडीत शस्त्रांचे तुकडे शोधले. प्रत्यक्षात तुकडे शोधणार्यांना पूर्ण पिस्तूल सापडले. या सर्व असंबद्ध गोष्टी सोडून केवळ ‘सूत्रधार पकडा’, अशी मागणी केली जाते. याला कधी ‘विवेकवाद’ म्हणता येईल का ? – संपादक)
५. सीबीआयने प्रविष्ट केलेल्या पुरवणी आरोपपत्रात म्हटले आहे की, डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण करतांना या प्रकरणातील संशयित आरोपींचा कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येशी असलेला संबंध उघड झाला आहे. त्यातून हे स्पष्ट झाले आहे की, ही केवळ हत्येची घटना नसून हे आतंकवादी कृत्य आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींना ‘अवैध कृत्य नियंत्रण कायदा १९६७’ (Unlawful Activities Prevention Act 1967) हा कायदा लावण्यात आला आहे. (‘या प्रकरणातील आरोपींवरील खटला न्यायालयाने चालवावा’, अशी मागणी अंनिसवाले का करत नाहीत ? खटला चालवला, तर खरे खुनी कोण आहेत ? हे समजले असते; पण अंनिसवाले वेगळीच मागणी करत असल्यामुळे गेली ८ वर्षे खटल्याचे अन्वेषण भरकटत आहे ! – संपादक)