पुणे येथील सेवा विकास बँकेतून पैसे काढून घेण्यासाठी खातेदारांची गर्दी

कर्जवाटपात घोटाळा झाल्याचे प्रकरण

पिंपरी (जिल्हा पुणे), २२ ऑगस्ट – येथील सेवा विकास बँकेत कर्जवाटपात ४२९.५७ कोटी रुपयांचा अपव्यवहार झाला आहे. या प्रकरणी अधिकोषाचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि कर्जदार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे खातेदार आणि ठेवीदार यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातूनच पिंपरीतील मुख्य शाखा आणि पिंपरी वाघेरे येथील शाखेत पैसे काढून घेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून येते.

अधिकोष सध्या प्रत्येक खातेधारकाला १० सहस्र रुपये देत आहेत. त्यापेक्षा अधिक पैसे असलेल्यांना पुढील आठवड्यात पैसे दिले जाणार असल्याचे खातेदारांनी सांगितले, तर मुख्य शाखेच्या व्यवस्थापक सीमा शर्मा म्हणाल्या, ‘‘जसे पैसे येत आहेत, त्याप्रमाणे पैशांचे वाटप चालू आहे. कुणालाही पैसे नाकारले जात नाहीत. अधिकोषाचे सर्व व्यवहार सुरळीत चालू असून खातेदारांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.