सातारा, २२ ऑगस्ट (वार्ता.) – सातारा जिल्ह्यात गृहअलगीकरणाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात अडचणी येत आहेत. जिल्ह्यातील सातारा, कराड, फलटण आणि खटाव या तालुक्यांतील बाधितांची संख्या वाढतच आहे. यासाठी ग्रामदक्षता समित्यांनी सक्रीय व्हावे, प्रतिबंधित क्षेत्रातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये नियमांची कडक कारवाई व्हावी आणि कोरोनाच्या तपासण्या वाढवण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी आधुनिक वैद्य राधाकिशन पवार यांनी दिल्या आहेत.
पवार पुढे म्हणाले की, सध्या जिल्ह्यातील ६२.७५ टक्के रुग्ण गृहअलगीकरणामध्ये उपचार घेत आहेत. लसीचे दोन्ही डोस घेऊनही कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.