श्री तुळजाभवानी मंदिरासमोर पुजारी आणि व्यापारी यांचे लाक्षणिक उपोषण !

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीचे मंदिर खुले करण्याच्या मागणीसाठी…

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीचे मंदिर खुले करण्यात यावे, या मागणीसाठी तुळजापूर येथील पुजारी आणि व्यापारी यांनी मंदिरासमोर १७ ऑगस्ट या दिवशी लाक्षणिक उपोषण केले. ‘दार उघड बये आता दार उघड’, ‘आई राजा उदो उदो’, अशा घोषणा देत पुजारी आणि व्यापारी यांनी या आंदोलनाला प्रारंभ केला. या वेळी आंदोलनाला पाठिंबा देणार्‍यांसाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.

१. मंदिरे बंद असल्याने पुजारी आणि व्यापारी यांची उपासमार होत असून अर्थकारण ठप्प झाले आहे. राज्यातील सर्व व्यवहार खुले झाले आहेत. रेल्वे, बस, मॉल, मद्य विक्रीची दुकाने चालू आहेत; मात्र केवळ मंदिरे बंद का ?, असा प्रश्न या वेळी पुजार्‍यांनी उपस्थित केला. आंदोलनातील मागण्या मान्य न झाल्यास तुळजापूर शहर बेमुदत बंद करण्यात येईल, अशी चेतावणी या वेळी पुजार्‍यांनी राज्य सरकारला दिली.

२. पुजारी आणि व्यापारी यांच्या लाक्षणिक उपोषणाला भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हेही उपस्थित होते. या वेळी आमदार पाटील म्हणाले, ‘‘मंदिरे खुली करण्याच्या मागणीची पूर्तता न झाल्यास पुजारी आणि व्यापारी यांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. तरीही मंदिरे खुली न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.’’