अशा लोकप्रतिनिधींच्या हातात देश कधीतरी सुरक्षित राहील का ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक
पुणे – भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील (बी.एच्.आर्.) आर्थिक अपव्यवहार प्रकरणात भाजपचे आमदार चंदुलाल पटेल यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन संमत केला आहे. विशेष सत्र न्यायाधीश एस्.एस्. गोसावी यांनी हा आदेश दिला असून पटेल यांना १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन संमत केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा तपास चालू केल्यानंतर अनेक मोठ्या व्यक्तींची नावे यात समोर आली होती. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ६ जिल्ह्यांत एकाच वेळी धाड टाकून १२ जणांना कह्यात घेऊन पटेल यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले. तेव्हापासून पटेल बेपत्ता होते आणि अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्नरत होते. न्यायालयाने २० टक्के रक्कम १० दिवसांच्या आत, तर उर्वरित २० टक्के रक्कम तीन मासांच्या आत भरण्याचे आदेश देऊन पटेल यांचा जामीन संमत केला.