गोव्यात ७ मासांत बलात्काराच्या १४ घटना, तर १५ अल्पवयीन मुलींचे अपहरण !

पणजी, १७ ऑगस्ट (वार्ता.) – कळंगुट येथे एका मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे गोव्यात ‘महिला खरेच सुरक्षित आहेत का ?’ हा प्रश्न चर्चेत आला आहे. गोव्यात गेल्या ७ मासांत १४ बलात्कार, १२ विनयभंग आणि १५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना नोंद झाल्या असून प्रशासन मात्र यासंबंधी काहीही उपाययोजना करतांना दिसत नाही.

१. २५ जुलै २०२१ या दिवशी बाणावली येथे दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना घडल्यावर राज्यभर खळबळ उडाली होती. हा प्रश्न विधानसभेत चर्चेस आला, त्या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे’, असे म्हटले होते.

२. फोंडा येथील एका विद्यार्थिनीचा तिच्या शिक्षकानेच विनयभंग केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले होते.

३. त्यापूर्वी जून मासात एका युवतीने ‘मुरगाव पोलीस ठाण्यात उपनिरीक्षकपदी असलेल्या व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला आणि फसवणूक केली’, अशी तक्रार केली होती.

४. जुलै मासात केपे येथील एका आसामी युवतीला नोकरीचे आमीष दाखवून दोघांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले.

५. फोंडा येथे एका युवतीशी ओळख वाढवून नंतर तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली केरळमधील २ ट्रकचालकांना अटक करण्यात आली.

६. डिचोली येथेही काही धर्मांधांकडून एका हिंदु युवतीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती.

७. १७ एप्रिल २०२१ या दिवशी उत्तर गोव्यात बालिका आश्रम चालवत असलेल्या आश्रमचालकानेच आश्रमातील मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती.

येथे एकूण घटनांपैकी काही घटनांचीच माहिती दिली आहे. या सर्व घटनांमुळे गोव्यात महिला सुरक्षित नसल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे.