नगर – ऋषि-मुनींकडून चालत आलेल्या पुरातन भारतीय संस्कृतीचे जतन करण्याच्या सद्हेतूने प्राचीन संस्कृती संवर्धन मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाने श्रावण मासाचे औचित्य साधून पारंपरिक प्रथेप्रमाणे नगर शहरातील विविध भागांमधील मंदिरांमध्ये नवनाथ ग्रंथ पारायण सोहळ्यांचा शुभारंभ विधीवत् केला आहे.
कोरोना महामारीच्या संसर्गामुळे सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत पारंपरिक प्रथा जपण्याची दक्षता घेत पूर्वापार प्रथेचा हा वारसा पुढील पिढीसमोर ठेवण्यासाठी श्रावण मासातील नवनाथ ग्रंथ पारायण सोहळ्याचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. आजवर ग्रामीण आणि दुर्गम भागांसह शहर अन् महानगर येथे श्रावण मासात नवनाथ भक्तिसार, शिवमहापुराण, श्रीमद्भागवत, श्रीमद्भगवत गीता, ज्ञानेश्वरी, हरिविजय, दासबोध, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत, पुराण आदी ग्रंथांचे पारायण मंदिरांमध्ये चालत आले आहे. भाविकांनी घरोघरीही संपूर्ण मास ग्रंथांचे पारायण करण्याची परंपरा आजच्या संगणक युगातही श्रद्धेने जतन केली आहे.
भाविकांनी स्वयंस्फूर्तीने आपापल्या परिसरातील मंदिरांमध्ये श्रावण मासात ग्रंथ पारायण सोहळ्यांचे आयोजन शासकिय नियम पाळून करावे, असे आवाहन प्राचीन संस्कृती संवर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बापू ठाणगे, विनोद काशीद, अमोल शिंदे, आशिष क्षीरसागर, अंकुश तरवडे आदींनी केले आहे. आपल्या परिसरामधील मंदिरांमध्ये श्रावणातील ग्रंथ पारायण व्हावे अशी इच्छा असलेल्या भाविकांनी नवनाथ भक्तिसार ग्रंथ आणि वाचक उपलब्ध होण्याकरिता प्राचीन संस्कृती संवर्धन मंडळाशी ९४२२२ २९८९७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.