पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात !
अनधिकृत पेट्रोलपंप हटवण्यासाठी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागते, हे जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना लज्जास्पद आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी हा प्रश्न सोडवला पाहिजे ! – संपादक
वर्धा – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पेट्रोलपंपाचे अनधिकृत बांधकाम चालू असून ते थांबवण्यात यावे आणि पेट्रोलपंपाची भूमी पालटण्यात यावी, यासाठी येथील पोलीस प्रशासनाच्या विरोधात ‘पेट्रोलपंप हटाव कृती समिती’च्या वतीने १५ ऑगस्ट या दिवशी मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात जिल्ह्यातील समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी तेथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ४ घंटे आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. सहस्रोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या आंदोलनकर्त्यांकडून ‘पेट्रोलपंप हटवण्यात यावा’, अशी घोषणा देण्यात आली. या वेळी कृती समितीच्या पदाधिकार्यांनी मते व्यक्त केली, तर इतरांनी पोलीस विभाग, जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार यांचा निषेध नोंदवला.