कोरोनाच्या संकटकाळात कोरोनाची लस देऊन लोकांचे जीव वाचवण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे घेऊन लस देणार्या आरोग्यसेवकांवर बडतर्फाची कारवाई केली पाहिजे – संपादक
संभाजीनगर – जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोनाची लस चोरून प्रत्येकी ३०० रुपये घेऊन लसीकरण करणारे आरोग्यसेवक गणेश दुरोळे आणि सय्यद अमजद सय्यद अहेमद यांचे निलंबन करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी काढले आहेत. ‘लोकांना घंटोन्घंटे रांगेत उभे राहूनही लस मिळत नाही. असे असतांना लोकांकडून ३०० रुपये घेऊन कोरोनाची लस दिली जात आहे’, अशा तक्रारी लोकांनी पोलिसांकडे केल्या होत्या.
त्यानंतर पोलिसांनी साजापूर येथील एका घरात धाड टाकून दुरोळे यास रंगेहाथ पकडले होते. त्याच्या कह्यातून ‘कोविड-१९’, ‘व्हॅक्सिनची बॉटल’ (‘वॉयल’), रिकामी ‘बॉटल’ (‘वॉयल’), नवीन आणि वापरलेली ‘इंजेक्शने’, रोख रक्कम आदी साहित्य जप्त केले होते. ‘कोविड-१९’ ची ‘वॉयल्स’ रांजणगाव उपकेंद्राचे प्रभारी सुपरवायझर सय्यद अमजद यांच्याकडून घेतले आहे, असे दुरोळे यांनी पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली.