मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील ‘नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (एन्आय् टी) महाविद्यालयावर ६ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११ वाजता अंमलबजावणी संचालनालयाने धाड टाकली.
अनिल देशमुख अध्यक्ष असलेल्या ‘श्री साई शिक्षण संस्थे’च्या अंतर्गत या महाविद्यालयाचे कामकाज चालत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने ‘श्री साई शिक्षण संस्थे’च्या कार्यालयावर यापूर्वीही धाड टाकली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. याविषयीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात चालू आहे. या प्रकरणी अन्वेषणांना उपस्थित रहावे, यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने आतापर्यंत अनिल देशमुख यांना ४ वेळा समन्स दिला आहे; मात्र ते अद्याप अन्वेषणाला सामोरे गेलेले नाहीत. दुसर्या बाजूला अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वाेच्च न्यायालयात केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने अनिल देशमुख यांच्या २ खासगी सचिवांना अटक केली आहे. या सर्व घडामोडींवरून येत्या काही दिवसांत अनिल देशमुख यांची अटक निश्चित मानली जात आहे.