परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेले काव्यसंग्रहाचे ग्रंथ वाचल्यावर साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. ग्रंथवाचन करतांना भाव जागृत होणे

श्रीमती स्मिता नवलकर

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेला ‘साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो !’ हा काव्यसंग्रहाचा ग्रंथ मी वाचायला घेतला. वाचतांना ‘२ घंटे कधी झाले ?’, हे कळलेच नाही. २ दिवसांनी ‘आध्यात्मिक काव्यसंग्रह’ हा ग्रंथ वाचायला घेतला आणि तोही वाचून पूर्ण केला. वाचायला घेतल्यावर ‘ग्रंथ हातातून ठेवू नये’, असे वाटत होते. त्यामुळे तो लगेच वाचून पूर्ण झाला. ग्रंथ वाचतांना प.पू. गुरुदेव वैद्यकीय क्षेत्रातील असूनही त्यांची पद्याकडील ओढ आणि प्रगल्भता पाहिल्यावर ‘हे केवळ माझे श्रीविष्णुस्वरूप प.पू. गुरुदेवच करू शकतात’, असा विचार येऊन माझा भाव जागृत झाला.

२. ग्रंथांचे वाचन करतांना शिकायला मिळालेली सूत्रे

अ. कविता वाचतांना परात्पर गुरु डॉक्टरांची प.पू. भक्तराज महाराज यांच्यावरील श्रद्धा अन् भक्ती, परात्पर गुरुदेवांचे विचार, साधकांविषयी असलेली प्रीती, साधकांचे निरीक्षण, सगळ्यांकडून शिकण्याची वृत्ती, व्यापकता इत्यादी ईश्वरी गुण मला अनुभवायला मिळाले.

आ. दोन्ही ग्रंथ पद्यात असूनही वाचायला आणि कळायला सोपे वाटले. परात्पर गुरुदेवांनी लिहिल्याप्रमाणे ‘पद्यातून गद्याकडे कसे वळायचे आणि समजून घ्यायचे ?’, हे मला शिकायला मिळाले.

३. काव्यग्रंथ वाचन करतांना आलेल्या अनुभूती

अ. इतर वेळी कविता वाचायला कंटाळा येतो; परंतु ‘आध्यात्मिक काव्यसंग्रह’ या ग्रंथातील कविता आणि लिखाण वाचतांना ‘ग्रंथ हातातून ठेवू नये’, असे वाटले. वाचतांना भावजागृती होऊन भावाश्रू वहात होते. ‘ग्रंथातून चैतन्य मिळत आहे’, असे मला वाटले.

आ. ग्रंथातील इतर साधकांनी केलेल्या कविता पाहून ‘मला कधी कविता लिहायला जमले नाही आणि जमेल असे वाटत नाही’, ‘मलाही २ ओळी लिहिता आल्या पाहिजेत’, असा विचार माझ्या मनात आला. २.१२.२०२० या रात्री ध्यानाला बसल्यावर देवाने अकस्मात् मला पुढील ओळी सुचवल्या. त्या श्री गुरुचरणी अर्पण करते.

सदा सर्वदा सत्संग तुझा मिळावा । 
तुझ्या सेवेत देह माझा झिजावा ।।
तव चरणी स्थान तू दिलेस जयंता (टीप) ।
म्हणोनी अर्पिते तव चरणी कोटीशः कृतज्ञता ।।

(टीप : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले)

परात्पर गुरु डॉक्टर नेहमी म्हणतात, ‘‘साधकांनो, तुम्ही जिंकलात मी हरलो !’’; परंतु परात्पर गुरुदेव, साधकांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही हरता आणि आम्हाला जिंकवता ! तुमच्या मार्गदर्शनाने आणि अस्तित्वामुळेच आम्ही साधना अन् सेवा करू शकतो. तुम्ही आम्हाला कृतीतून, शब्दांतून, आचरणातून, स्थुलातून आणि सूक्ष्मातूनही शिकवता. आमच्याकडून सर्व करवून घेणारेही तुम्हीच आहात. ‘प.पू. गुरुदेवांचा सत्संग आम्हाला सदा मिळो’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना !’

– श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.१२.२०२०)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक