भारताने पाकच्या उच्चायुक्तालयातील अधिकार्‍याला जाब विचारला !

पाकमध्ये गणपति मंदिराच्या तोडफोडीचे प्रकरण

केवळ जाब विचारून थांबू नये, तर पाकमधील प्रत्येक हिंदूचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण कसे होईल, यासाठीही प्रयत्न करावा, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

मंदिराबाहरे जमलेला धर्मांध आक्रमणकर्त्यांचा जमाव

नवी देहली – पाकच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खान भागामध्ये धर्मांधांनी  गणपति मंदिराची तोडफोड केल्याच्या प्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतातील पाक उच्चायुक्तालयातील प्रभारी अधिकार्‍याला बोलावून त्याला कडक भाषेत जाब विचारण्यात आला. ‘पाकमध्ये सातत्याने अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत आहेत’, असेही या वेळी सांगण्यात आले.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, आम्ही या घटनेचा निषेध नोंदवला आहे. गेल्या वर्षी जानेवारी मासामध्ये पाकच्या सिंध प्रांतातील माता राणी भटियानी मंदिर, गुरुद्वार श्री जन्म स्थान, डिसेंबर २०२० मध्ये खैबर पख्तूनख्वाच्या कारक येथे अनेक मंदिरे आणि गुरुद्वारा यांवर आक्रमणे करण्यात आली. पाकमध्ये सातत्याने अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर, तसेच धार्मिक स्थळांवर आक्रमणे होत असतांना तेथील सरकार आणि सुरक्षा यंत्रणा निष्क्रीय रहात आहेत. पाकने अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेसाठी कृती करावी, असे आम्ही सांगितले आहे.

मंदिराचा जीर्णोद्धार करू ! – पंतप्रधान इम्रान खान

जगाला दाखवण्यासाठी पाक सरकार मंदिराचा जीर्णोद्धार करील; मात्र काही काळाने धर्मांध त्यावर पुन्हा आक्रमण करतील, हेही तितकेच खरे ! – संपादक

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेविषयी ट्वीट करून म्हटले की, गणपति मंदिरावर झालेल्या आक्रमणाचा मी निषेध करतो. मी पंजाब प्रांताच्या पोलीस महानिरीक्षकांशी बोललो आहे आणि त्यांना सर्व दोषींना अटक करण्यास आणि याप्रकरणी निष्काळजीपणा करणार्‍या पोलिसांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. तसेच सरकार मंदिराचा जीर्णोद्धारही करील.