यात्रेच्या विरोधासाठी भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
सांखळी, १ ऑगस्ट (वार्ता.) – काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सांखळी येथील निवासस्थानासमोर १ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ‘सद्बुद्धी’ यात्रा काढण्याचा प्रयत्न केल्याने या ठिकाणी गदारोळ माजला. काँग्रेसच्या नियोजित ‘सद्बुद्धी’ यात्रेच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सांखळी येथील निवासस्थानाजवळ मोठ्या प्रमाणावर पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. काँग्रेसची ‘सद्बुद्धी’ यात्रा प्रारंभ होत असतांना पोलिसांनी ही यात्रा रोखली आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बलपूर्वक बसमध्ये बसवले. काही वेळानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सोडण्यात आले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असा काँग्रेसने आरोप केला आहे. काँग्रेसच्या मते ‘मुख्यमंत्र्यांचे डोके ठिकाणावर यावे आणि त्यांना त्यांच्या पदाच्या दायित्वाची जाणीव व्हावी’, या हेतूने काँग्रेस पक्षाने १ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या सांखळी येथील निवासस्थानासमोर ‘सद्बुद्धी’ यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेला शह देण्यासाठी १ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सांखळी येथील निवासस्थानासमोर जमले होते. भाजपचे कायकर्ते मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ आणि काँग्रेसच्या विरोधात घोषणा देत होते.
पोलिसांनी कह्यात घेऊन सोडल्यानंतर काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्तीने पोलिसांनी तिचे कपडे फाडल्याचा आणि तिला धक्काबुक्की केल्याचा आरोप केला, तसेच काँग्रेसच्या अन्य कार्यकर्त्यांनीही त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला.