अतीवृष्टीने वाहून गेलेल्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याच्या सातारा जिल्हा परिषदेच्या सूचना

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, ३० जुलै (वार्ता.) – २२ जुलै या दिवशी जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या तलावाची हानी झाली आहे. गावपातळीवरील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या मोटारी आणि अन्य हानी झालेली आहे. या योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी महावितरण आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तत्परतेने काम चालू करावे, अशा सूचना सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी दिल्या. जिल्हा परिषदेची जलसंधारण आणि स्थायी समितीची बैठक जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये पार पडली. या वेळी उपाध्यक्ष प्रदीप विधाते आणि मुख्याधिकारी यांच्यासह सर्व सभापती आणि खातेप्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत हानी झालेल्या तलावाची डागडुजी करण्यासाठी ४९ लाख रुपयांची तरतूद करण्याच्या सूचना देण्यात आल्या, तसेच अतीवृष्टीमुळे घेण्यात आलेल्या हानीचा आढावा घेतला, तर ३ कोटी ६२ लाख रुपयांची हानी झाली असल्याची माहिती अभियंत्यांनी बैठकीत दिली. उदयसिंह उंडाळकर यांनी तलावावरील वाढलेली झाडी काढण्यासाठी पहाणी करण्यात यावी, अशी मागणी केली, तसेच मत्स्य व्यवसायासाठी राखीव असलेल्या निधीतून तलाव दुरुस्ती करण्याच्या सूचनाही काही सदस्यांनी मांडल्या.