आजपासून पूरग्रस्तांच्या खात्यावर १० सहस्र रुपये रक्कम जमा होणार ! – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री

 

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (सौजन्य : ANI)

नागपूर – ‘कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे अनेकांची प्रचंड हानी झाली आहे. या सर्वांना राज्यशासनाने तातडीचे १० सहस्र रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे. ३० जुलैपासून १० सहस्र रुपये पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार आहे’, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. ‘पूरस्थिती आणि हानी यांची पहाणी करण्यासाठी केंद्राचे पथक तातडीने यावे, यासाठी आम्ही केंद्र सरकारला पत्र पाठवत आहोत. विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिस्थितीची माहिती देऊन त्यांनाही पहाणी करण्यासाठी बोलवावे’, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की,

१. रोख रकमेचे वाटप केले, तर ‘पैशाचे वाटप योग्य झालेले नाही, अपप्रकार झाला आहे’, असे आरोप होतात. त्या भानगडीत आम्हाला पडायचे नाही. त्यामुळे ३० जुलैपासूनच आम्ही पूरग्रस्तांना पैसे देण्याची व्यवस्था करणार आहोत.

२. महापुरामुळे हानी झालेल्या ठिकाणी तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल प्रशासनाला ८ दिवसांत देण्यास सांगितले आहे. हा अहवाल केंद्र सरकारला पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

३. अतीवृष्टीमुळे राज्यातील ४ लाख हेक्टर शेतीची हानी झाली आहे. हा प्राथमिक अंदाज असून नांदेड जिल्ह्यात ८० सहस्र हेक्टर शेतीची हानी झाली आहे. तिथे एकाच दिवशी १६६ मिलिमीटर पाऊस पडला असून काही ठिकाणी ४०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

४. कोयना धरणाच्या परिसरात ४८ घंट्यांत १ सहस्र ७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून तेथील पाण्याच्या साठ्यात १७ ‘टी.एम्.सी.’ इतकी वाढ झाली आहे. ढगफुटीपेक्षा हे भयानक असून निसर्गाचे संतुलन बिघडल्याची ही परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक समित्यांचा अभ्यास करावा लागेल. हा सर्व परिसर ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ समजून काम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आपत्तीजनक घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासमवेत तज्ञांचा उपदेश घेणार आहे.