‘सद्गुरु राजेंद्र शिंदे माझा व्यष्टी आढावा घेतात. व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी असणारे गैरसमज, सेवेइतकेच व्यष्टी साधनेला प्राधान्य देण्याचे महत्त्व, दायित्व घेऊन साधना करण्याचे महत्त्व, माझ्या साधनेत येणारे अडथळे आणि मनात येणारे प्रश्न यांविषयी सद्गुरु राजेंद्रदादांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. सर्व साधकांना त्यातून शिकायला मिळेल; म्हणून ते येथे दिले आहे.’
१. सेवेवर मन लगेच एकाग्र होत असल्याने आध्यात्मिक त्रास होत असला, तरी साधकाला व्यष्टी साधना करण्यापेक्षा सेवा करावीशी वाटते !
‘साधकांना सेवा करतांना त्रास होत नाही; कारण सेवा करतांना मन लगेच एकाग्र होते. सेवेत मन एकाग्र झाल्यामुळे मनातील इतर विचारांवर मात करता येते. ईश्वरी सेवा असल्याने त्यातून चैतन्य ग्रहण होते आणि आनंदही मिळतो. त्यामुळे साधक सहजतेने ८ ते १० घंटे सेवा करू शकतात. साधकांना आध्यात्मिक त्रास होत असला, तरी त्यांना सेवा करतांना चांगले वाटते; म्हणून साधक सेवाच करत रहातात. त्रास होत असतांना साधक तेवढा वेळ व्यष्टी साधना करू शकत नाहीत; कारण नामजप, स्वभावदोष आणि अहं यांची सारणी लिहिणे, स्वयंसूचना सत्रे करणे, भावजागृतीचे प्रयत्न करणे इत्यादी प्रयत्न करतांना त्यांचे मन लगेच एकाग्र होत नाही. काही वेळा थोडा वेळ होते; पण पुष्कळ वेळ एकाग्रता साधता येत नाही.
२. वाईट शक्तींना साधकांना त्यांचे स्वभावदोष आणि अहं यांना धरून त्रास देणे सोपे असल्याने त्या व्यष्टी साधना अन् स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया यांना तीव्र विरोध करतात !
वाईट शक्ती साधकांना त्यांचे स्वभावदोष आणि अहं यांना धरून त्रास देत असतात. व्यष्टी साधनेच्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेत सारणी लिहिणे, स्वयंसूचना सत्रे करणे, यांमुळे साधकांचे स्वभावदोष अन् अहं अल्प होतो. त्यामुळे मोठ्या वाईट शक्तींना साधकांना त्रास देणे कठीण होते; म्हणून ते या प्रक्रियेला तीव्र विरोध करत असतात. अशा वेळी वाईट शक्तींचे षड्यंत्र लक्षात घेऊन साधक लढाऊ वृत्तीने लढल्यास त्याला या स्थितीवर मात करता येते.
३. व्यष्टी साधना करण्यास वाईट शक्तींचा विरोध असण्यामागील कारणे
अ. आपली व्यष्टी साधना चांगली असेल, तर आपल्याकडून सेवा करतांना चुका अल्प होतात. म्हणजेच सेवा परिपूर्ण होऊ लागते.
आ. भावजागृतीचे प्रयत्न एकाग्रतेने व्हायला लागल्यामुळे सेवा भावपूर्ण करण्याचे प्रयत्न वाढतात. परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करण्याचे प्रयत्न वाढल्याने समष्टी साधनाही चांगली होऊन जलद आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळेही वाईट शक्ती व्यष्टी साधना करतांना त्रास देतात.
इ. समष्टी साधना चांगली करतांना साधकांची आणि वातावरणातील सात्त्विकता गतीने वाढू लागते; म्हणून ते समष्टी साधनेचा पाया असलेल्या व्यष्टी साधनेस विरोध करतात.
४. शरिरावर आलेले आवरण अल्प करण्यासाठी अधिक ऊर्जा व्यय होऊन थकवा येऊ शकतो !
साधकांच्या साधनेला विरोध करण्यासाठी वाईट शक्ती विविध प्रकारे आक्रमणे करतात. अशी आक्रमणे केल्यावर अथवा आध्यात्मिक त्रास असल्यास तो न्यून होण्यासाठी प्राणशक्ती व्यय होते. त्यामुळे साधकांना अचानक थकवा येतो. काही वेळा मनातील विचारांचे प्रमाण अधिक वाढल्याने शरिरावरील आवरण वाढते. ते अल्प करण्यासाठी अधिक ऊर्जा व्यय होते आणि त्यामुळेही थकवा येतो. अशा वेळी ‘आवरण काढणे, त्रासावर उपाय म्हणजे प्राणशक्तीवहन पद्धतीप्रमाणे नामजप शोधून तो करणे’, असे उपाय करायला हवेत.
५. दायित्व घेऊन साधना करण्याचे महत्त्व
साधकांना ‘स्वतःमध्ये स्थिरता आल्यावर आणि ६० टक्के पातळी झाल्यावर दायित्व घेऊन सेवा करीन’, असे वाटते. तोपर्यंत त्याला ‘नेतृत्व घेऊन सेवा करू नये’, असे वाटते. ‘मला वाटते, तसे करावे’, ही स्वेच्छा आहे. अध्यात्मात स्वेच्छेला किंमत शून्य असते. हा साधनेतील प्राथमिक टप्प्याचा अडथळा आहे. अध्यात्मात म्हटले आहे, ‘स्वेच्छेने वागणे, ही प्राण्यांची योनी आहे. स्वेच्छेने वागणारा मनुष्य हा शिंग आणि शेपूट नसलेला प्राणी असतो.’ आपण बुद्धीने ठरवतो; पण ‘अध्यात्म हे बुद्धीच्या पलीकडचे शास्त्र आहे. बुद्धीला मर्यादा आहेत. त्यामुळे बुद्धीने विचार करण्याला मर्यादा घातल्या पाहिजेत. मनात एखादा विचार आला, तरी तो योग्य आहे कि नाही, याची निश्चिती करून त्याप्रमाणे कृती करायला हवी. एखाद्याला सेवेचे दायित्व दिले, तर ‘ते का दिले ?’ असा बुद्धीने विचार न करता मिळालेले दायित्व चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी बुद्धीचा वापर करायचा. ‘दायित्व हे स्थिर होण्यासाठीच आहे’, हे लक्षात घ्यायला हवे; कारण आपण जेवढे दायित्व घेतो, तेवढे आपल्यात व्यापकत्व आणि स्थिरता यायला आरंभ होतो. म्हणजे साधकांमध्ये ईश्वरी गुण निर्माण होतो.
५ अ. दायित्व घेण्याविषयी अपसमज आणि योग्य कृती : ‘६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यानंतर दायित्व घेऊया’, असे कुणाला वाटत असेल, तर साधकाला ‘तो ६० टक्के आध्यात्मिक पातळी कधी गाठणार’, हे ठाऊक आहे का ? निदान ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्यासाठी तरी दायित्व घेऊन सेवा करायला हवी. जेवढे दायित्व अधिक, तेवढी सेवा अधिक आणि जितकी सेवा अधिक सेवा करू, तेवढी साधना अधिक होणार आहे. साधना अधिक झाली की, आपोआप प्रगती गतीने होईल.
५ आ. दायित्वाविषयी व्यवहार आणि अध्यात्म यांत असलेला भेद
५ आ १. व्यवहार : व्यवहारात शिक्षण पाहून दायित्व दिले जाते.
५ आ २. अध्यात्म : सर्वसाधारणपणे समाजातील लोकांना वाटते, ‘आपण पुष्कळ चांगले आहोत !’, ‘आपण किती आदर्श आहोत !’; पण सेवा करू लागल्यावर कळते की, आपल्यात किती स्वभावदोष आणि अहं आहे ! तोपर्यंत साधक भ्रमातच रहातो. अध्यात्मात सेवेच्या माध्यमातून गुरु शिष्याला दायित्व देतात आणि सक्षम करतात.
अ. दायित्व घेतल्यावरच ‘आपल्यामध्ये कोणते स्वभावदोष आहेत आणि कोणत्या गुणांचा अभाव आहे ?’ ते प्रकर्षाने लक्षात येते.
आ. ‘अध्यात्मात तुमची क्षमता आहे; म्हणून दायित्व देतात’, असे कधीच नसते. आपल्यात क्षमता निर्माण होण्यासाठीच देव दायित्व देतो.
इ. दायित्व घेतल्याविना ‘अध्यात्मात कर्ता-करविता भगवंत आहे’, याची अनुभूती घेता येत नाही. ‘दिलेली सेवा देव करवून घेणारच आहे’, असा भाव ठेवल्यास दायित्व घेण्यासाठी मन सकारात्मक होते आणि देवाचे साहाय्य मिळून दायित्वाने सेवा करणे सहज जमते.’
६. व्यष्टी आणि समष्टी साधना
६ अ. व्यष्टी साधनेचे महत्त्व
१. समष्टी सेवा करतांना आपल्याला आपले जे स्वभावदोष लक्षात येतात, ते घालवण्यासाठी व्यष्टी साधनाच करायला हवी. केवळ दृष्टीकोन घेऊन आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी स्वयंसूचना सत्रे, सारणी लिखाण करणे आणि चुका फलकावर लिहिणे, हे करायलाच हवे. तसेच आपण कृतीच्या स्तरावर प्रयत्न केले पाहिजेत.
२. व्यष्टी साधना करतांना गुणवर्धन केले, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन केले, तर तुमच्यातील सात्त्विकता वाढते, म्हणजे तुमची खर्या अर्थाने साधना होते. म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची प्रक्रिया चालू होते आणि ती वाईट शक्तींना नको असते; म्हणून तिला पुष्कळ विरोध होतो, उदा. स्वयंसूचना घेणे आवश्यक आहे; पण तसे होत नाही, नामजप होत नाही. या गोष्टींना प्रत्येक पावलापावलावर, टप्प्यावर वाईट शक्ती विरोध करतात.
३. यासाठी साधना चांगली करता येण्यासाठी व्यष्टी साधना चांगली असणे आवश्यक आहे.
६ आ. समष्टी साधनेचे महत्त्व
१. समष्टी सेवा करतांना स्वभावदोषांसहित सेवा केली, तर तुमची अधोगतीही होण्याची शक्यता आहे; कारण सेवेत पुष्कळ चुका झाल्या, तर आपण साधनेत मागे येण्याची शक्यता असते.
२. समष्टी सेवेतून आपल्यातील अहं, तसेच आपल्यात कोणते स्वभावदोष आहेत, ते कळतात, उदा. पाट्याटाकूपणा, आळस, चिडचिड करणे, उतावळेपणा, प्रतिमा जपणे, अपेक्षा करणे इत्यादी.
३. समष्टी सेवेचा लाभ म्हणजे ‘आपल्यात कोणत्या गुणांचा अभाव आहे’, हे समष्टीत राहिल्यावर पटकन लक्षात येते, उदा. चार साधकांकडून सेवा करवून घेतांना कळते की, आपल्यात प्रेमभाव किती आहे ? आपल्याला साधकांना समजून घेणे जमते का ? त्यांचे शांतपणे ऐकून घ्यायला जमले का ? त्यांचे नियोजन करण्यास जमते का ? इत्यादी.
४. समष्टी सेवेच्या माध्यमातून आपल्याला आपले खरे अंतरंग कळते, नाहीतर ‘आपण कसे आहोत ?’, ते आपल्याला कधीच कळू शकत नाही.
६ इ. व्यष्टी आणि समष्टी साधना एकमेकांना पूरक असणे
१. व्यष्टी साधनेला ३० टक्के आणि समष्टी साधनेला ७० टक्के महत्त्व असते. दोन्ही मिळून साधना होते. समष्टी साधनेच्या इमारतीचा पाया म्हणजे व्यष्टी साधना ! पाया लहान असला, तरी तोच इमारतीला आधार देण्यासाठी उपयोगी पडतो.
२. व्यष्टी साधना चांगली असली, तर सेवा साधना म्हणून होते; म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांनी समष्टी साधनेच्या समवेतच व्यष्टी साधना करण्याला महत्त्व दिले आहे.
३. ज्याची व्यष्टी साधना चांगली आहे, त्याची समष्टी साधनेची फलनिष्पत्ती पुष्कळ वाढते.
४. व्यष्टी साधना जेवढी चांगली कराल, तेवढा तुम्हाला समष्टी साधनेतही लाभ होतो; कारण समष्टी सेवा चुकांविरहित, भावपूर्ण करणे व्यष्टी साधनेमुळेच शक्य आहे.
५. व्यष्टी आणि समष्टी दोन्ही मिळून साधना आहे. समष्टी सेवा ही व्यष्टी साधनेला दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरते; म्हणूनच साधकांनी व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही साधनांना वेळ द्यायला हवा ! दोन्हींचे महत्त्व वेगळे आहे. दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. व्यष्टी साधनेतूनच समष्टी साधना करायला लागणारी ऊर्जा मिळते.
६. व्यष्टी आणि समष्टी साधनेचे गणित बसवायचे असेल, तर ‘पणतीचा दीप म्हणजे समष्टी साधना आणि पणतीतील वात अन् तेल म्हणजे व्यष्टी साधना !’ जोपर्यंत पणतीत वात आणि तेल आहे, तोपर्यंतच दीप चालू असतो, अन्यथा तो हळूहळू विझत जातो.’
७. आपल्याला व्यापक होऊन ईश्वराशी एकरूप व्हायचे असेल, तर प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक !
ईश्वराशी दोन मार्गांनी एकरूप होता येते. एकतर सूक्ष्म – सूक्ष्मतम – सूक्ष्मातिसूक्ष्म होत जाऊन ईश्वराच्या सूक्ष्म रूपाशी एकरूप होता येते आणि दुसरे म्हणजे व्यापक होत जाऊन ईश्वराच्या व्यापक रूपाशी एकरूप होता येते. आपल्याला व्यापक होऊनच ईश्वराशी एकरूप व्हायचे आहे, तर अयोग्य विचार न करता प्रत्यक्ष कृती करायला हवी.’
– सौ. अंजली झरकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
(२५.१.२०२०)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्या साठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वी च्या काळी ऋषि मुनींच्या यज्ञांत राक्षसांनी वि घ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठि काणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पि शाच तसेच करणी, भानामती यांचा प्रति बंध करण्यासाठी मंत्र दि ले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या नि वारणार्थ वि वि ध आध्यात्मि क उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगि तले आहेत.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |