सर्व धरणे निम्मी भरली !
नागपूर – राज्यात गेल्या आठवड्यात ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. त्यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे पुष्कळ हानी झाली, तरी अतीवृष्टीमुळे राज्यातील सर्व धरणे निम्मी भरली आहेत. त्यामुळे शेतकर्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या राज्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये ४८.४१ टक्के पाणीसाठा आहे. ८ दिवसांपूर्वी सर्व धरणांमध्ये सरासरी ३२ टक्के पाणीसाठा होता; मात्र एका आठवड्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे १६ टक्के पाणीसाठा वाढून तो ४८ टक्क्यांवर पोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ टक्के पाणीसाठा अधिक आहे.
अतीवृष्टीमुळे राज्यातील बर्याच भागात पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्या ७ तलावांतही पुष्कळ प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. सतत कोसळणार्या पावसामुळे मुंबई येथील एप्रिलपर्यंतच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मुंबई येथील तलावात सध्या ९ लाख ३६ सहस्र ९३३ दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. हे पाणी पुढील ८ मास पुरणार आहे.