नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवले
मुंब्रा येथील अनधिकृत इमारतींची वाढती संख्या पहाता ही इमारत अनधिकृत तर नाही ना, याची पडताळणी होणे आवश्यक !
ठाणे, २७ जुलै (वार्ता.) – येथील मुंब्रा भागातील ठाकूरपाडा परिसरात नाल्याच्या बाजूला असलेल्या ‘स्वस्तिक’ या ८ मजली इमारतीला एका बाजूने मोठे भगदाड पडल्यामुळे इमारतीतील ४० खोल्या सुरक्षेच्या दृष्टीने सील करण्यात आल्या आहेत.
भगदाड पडल्यामुळे इमारत धोकादायक परिस्थितीत आहे. सुदैवाने तेथे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्नीशमन दल यांनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. इमारत नाल्याजवळ बांधण्यात आलेली असून मुसळधार पावसामुळे भगदाड पडल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. (मुंब्रा येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. महानगरपालिकेने वेळीच अनधिकृत इमारतींवर कारवाई केली असती, तर आज ही वेळ आली नसती. – संपादक)