|
नुकताच येऊन गेलेला महापूर आणि त्यानंतर निर्माण झालेली भीषण स्थिती ही तर आपत्काळाची झलकच आहे. यापुढे येणार्या महाभयंकर आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा !
मुंबई/नागपूर/संभाजीनगर – कोरोनाच्या काळात दळणवळण बंदीमुळे अडचणीत आलेला कुक्कुटपालन व्यवसाय, कोंबडीचे महाग झालेले खाद्य, उत्पादन आणि इंधन दरवाढ यांमुळे वाहतूक व्ययात झालेली वाढ यांच्या एकत्रित परिणामामुळे चिकनचे दर वाढले आहेत, तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना बसलेल्या महापुराच्या तडाख्यामुळे दूधपुरवठा विस्कळीत होऊन दुधाचीही दरवाढ झाली आहे. अतीवृष्टीचा फटका बसल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत. या परिस्थितीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
१. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, संभाजीनगर, नाशिक आदी शहरांमध्ये चिकनच्या दरात २० ते ६० रुपयांनी वाढ झाली आहे. अतीवृष्टी आणि पूर यांमुळे भाज्यांचे मळे उद्ध्वस्त झाल्याने मुंबई येथे होणार्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे फळभाज्यांच्या दरांमध्ये किलोमागे १० ते १५ रुपये वाढ झाली आहे. ‘येत्या काही दिवसांत भाज्यांचा पुष्कळ तुटवडा निर्माण होईल’, असे व्यापार्यांनी सांगितले.
२. अंड्यांच्या दरातही वाढ झाली असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र येथे अतीवृष्टी, तसेच महापुरामुळे भाजीमळ्यांची नासाडी झाली आहे. त्याचा परिणाम भाज्यांच्या पुरवठ्यावर झाला असून आवक पुष्कळ प्रमाणात घटली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत.
३. कोल्हापूर जिल्ह्यांतून मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत होणार्या गोकुळ अन् वारणा दुधाच्या पुरवठ्यात ७० टक्के घट झाली आहे. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांत दुधाचा तुटवडा जाणवू लागला असून त्यातूनच काही ठिकाणी कृत्रिम दरवाढ झाली आहे.
४. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि रायगड भागांतून कोंबड्यांचा पुरवठा होत होता; मात्र मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात कोसळलेला मुसळधार पाऊस आणि महापूर यांमुळेही कोंबड्यांची आवक काही प्रमाणात घटली आहे. त्यामुळे दरवाढ झाली आहे.
नागपुरातही दरवाढ !गेल्या १५ दिवसांत अतीवृष्टीमुळे नागपुरातही भाज्यांची आवक घटली आहे. पूर्वी भाज्यांच्या ६०० गाड्या येत होत्या, आता ४५० गाड्याच येत आहेत. पूरस्थितीमुळे येत्या १० दिवसांत आवक आणखी घटून दरवाढीची शक्यता आहे. राज्यात २० सहस्रांहून अधिक कुक्कुटपालन केंद्रे असून त्यातील १० सहस्र केंद्रे चालू आहेत. कुक्कुट उत्पादन निम्म्यावर आले आहे. |