नगर – सरकारी कर्मचार्यांसाठी ड्रेसकोडसंबंधी मार्गदर्शक सूचना घोषित केल्यानंतर आता भ्रमणभाष (मोबाईल) वापरासंबंधीही सूचना दिल्या आहेत. कार्यालयात भ्रमणभाष वापरतांना शिष्टाचार न पाळल्याने सरकारची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे या सूचना घोषित केल्याचे सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे. सामाजिक माध्यमांच्या वापरासंबंधी यात महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. त्यांचे पालन न केल्यास काय कारवाई होणार ? याचा स्पष्ट उल्लेख परिपत्रकात नाही; मात्र या शिष्टाचाराच्या नियमांचा भंग झाल्यास कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्याने जी कारवाई केली जाते, ती कारवाई केली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भ्रमणभाष वापरासंबंधी घोषित केलेल्या काही महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे आहेत.
१. सरकारी कार्यालयीन कामासाठी दूरभाषचा (लँडलाईनचा) प्राधान्याने वापर करावा.
२. कार्यालयीन वेळेत आवश्यक असेल तेव्हाच भ्रमणभाषचा वापर करावा, तसेच भ्रमणभाषवर बोलतांना सौजन्यपूर्ण भाषा वापरावी.
३. लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यांनी भ्रमणभाषवर संपर्क केल्यास तात्काळ उत्तर द्यावे.
४. सामाजिक माध्यमांचा वापर करतांना वेळ आणि भाषा यांचे तारतम्य बाळगावे.
५. कार्यालयीन कामासाठी दौर्यावर असतांना आपला भ्रमणभाष बंद ठेवू नये.