संभाजीनगर – शहराला काही ठिकाणी ५, तर काही ठिकाणी ८ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असतांनाही नागरिकांना टँकरचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्ष २०१९ मध्ये १ सहस्र ६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन केले होते; मात्र या योजनेचे काम पूर्ण न झाल्याने शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
१६ लाख लोकसंख्या असणार्या शहराला दिवसाला २४० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे; मात्र शहरात पाणी साठवण्यासाठी पुरेसे जलकुंभ नाहीत. सध्या ५९ जलकुंभ असून यातील १७ जलकुंभ वापरात आहेत. यामुळे दिवसाला १३५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. यातून पाणीपुरवठ्याच्या वेळी २० टक्के पाण्याची गळती होते. या कारणास्तव शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही.