कोल्हापूर येथे राजस्थानी जैन समाजाकडून फूड पॅकेटचे वाटप !

मुकी जनावरे, पूरग्रस्त, प्रवासी, तसेच एन्.डी.आर्.एफ्.च्या सैनिकांना साहाय्य !

कोल्हापूर, २५ जुलै (वार्ता.) – महापुरामध्ये अडकलेल्या पूरग्रस्तांसाठी आणि मदतीला धावलेल्या एन्.डी.आर्.एफ्.च्या सैनिकांना येथील राजस्थानी जैन समाजाने २४ जुलै या दिवशी दिवसभरात अनुमाने ५ सहस्र फूड पॅकेट पुरवले असून ५०० मुक्या जनावरांनाही खाद्य पुरवठा केला. येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे महापुरात अडकलेल्या असंख्य पूरग्रस्तांना, महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांना, तसेच साहाय्यासाठी धाऊन आलेल्या पोलीस आणि एन्.डी.आर्.एफ्.च्या सैनिकांसाठी हे फूड पॅकेट पुरवण्यात आले.

या फूड पॅकेट्समध्ये मसाला पूरी, चटणी, लोणचे, बिस्किट आणि पाणी यांचा समावेश आहे. हे सेवाकार्य राजस्थानी जैन समाजाच्या गुजरी येथील मरुधर भवन येथील जागेतून चालू आहे. यासाठी १०० जैन समाज बांधव परिश्रम घेत आहेत.

एन्.डी.आर्.एफ्.च्या सैनिकांना राजस्थानी जैन समाजाचे साहाय्य !  

महापुरात अडकलेल्या कोल्हापुरकरांच्या सुटकेसाठी तात्काळ धावून आलेल्या एन्.डी.आर्.एफ्.च्या सैनिकांसाठी राजस्थानी जैन समाज धावला असून कर्तव्यावर असणार्‍या सुमारे १५० सैनिकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.

मुक्या जनावरांना खाद्य पुरवठा !

कोल्हापूर शहरातील अनुमाने ५०० मुक्या जनावरांनाही राजस्थानी जैन समाजाच्या वतीने चारा वाटप करण्यात आला. यामध्ये या जनावरांना विशेषतः गाईंसाठी भुसा आणि कडबा यांची व्यवस्था करण्यात आली.