सेलू (परभणी) येथे १० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस नाईक यांना अटक !

भ्रष्टाचाराने पोखरलेली पोलीस यंत्रणा !

लाचखोरांवर वेळीच कठोर कारवाई न होण्याचे हे गंभीर परिणाम ! लाचखोरीमुळे पोखरल्या गेलेल्या पोलीसयंत्रणा कधी सुधारणार ? लाचखोरांना कठोर शिक्षा केल्यासच या प्रकाराला आळा बसेल.

प्रतिकात्मक छायाचित्र

परभणी – जिल्ह्यातील सेलू येथील पोलीस उपअधीक्षक (उपविभागीय पोलीस अधिकारी) राजेंद्र पाल आणि पोलीस नाईक गणेश चव्हाण यांनी तक्रारदाराकडून १० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना २४ जुलै या दिवशी अटक केली. (परभणी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग असतांनाही तेथे तक्रार न करता तक्रारदाराने मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार का केली ? याचा अर्थ परभणी विभागात भ्रष्ट कारभार चालू आहे का ? अशी शंका येते. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी याची गंभीर नोंद घेऊन निश्चिती करावी. – संपादक)

१. तक्रारकर्त्याच्या मित्राच्या अपघाती मृत्यूप्रकरणी ३ मे २०१९ या दिवशी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. मृताच्या पत्नीसमवेत तक्रारकर्त्याचे झालेले दूरभाषवरील संभाषण प्रसारित झाले होते.

२. ९ जुलै २०२१ या दिवशी पोलीस उपअधीक्षक पाल यांनी तक्रारकर्त्यास कार्यालयात बोलावून ‘तुझी प्रसारित झालेली ‘क्लिप’ मी ऐकली असून त्यातून तुला बाहेर पडायचे असेल, तर मला २ कोटी रुपये द्यावे लागतील’, असे सुनावले.

३. पाल यांनी तक्रारकर्त्यास वारंवार दूरभाष करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून पुन्हा २ कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली.

४. तक्रारकर्त्याने २२ जुलै या दिवशी या प्रकरणी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात प्रत्यक्ष येऊन लेखी तक्रार दिली होती.

५. तक्रारदाराने केलेल्या तडजोडीत दीड कोटी रुपये द्यायचे ठरले होते. पोलीस नाईक चव्हाण यांनी तक्रारकर्त्याच्या भावाकडून त्यातील पहिला हप्ता म्हणून १० लाख रुपयांची लाच स्वीकारली. तेव्हा त्यास रंगेहात पकडण्यात आले.