राज्यात ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू नाही ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री  

आरोग्यमंत्री राजेश टोपे

पुणे – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. राज्य सरकारने सुद्धा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे राज्यात एकही मृत्यू झाला नसल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राष्ट्रीय शीतसाखळी संशोधन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी पुण्यात आल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अधिवेशन सभागृहात बसलेले काही जण ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचे म्हणत असले तरी त्यांनी राज्याचे नाव घेतलेले नाही. देशातील अन्य राज्यांत मृत्यू झाले असतील तर त्याविषयी मी भाष्य करणार नाही, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर, रायगड आणि चिपळूण येथील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मेडिकल युनिट तयार करून नागरिकांना सेवा देणार आहे, तसेच लसीकरण करण्यावरही भर देणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.