कांदळी (पुणे) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीस्थळी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

सनातनच्या ‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग १)’ या चैतन्यदायी ग्रंथाचे प्रकाशन

‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग १)’ या ग्रंथाचे प्रकाशन करतांना पू. (श्रीमती) जीजी (प.पू. बाबांच्या पत्नी)

कांदळी (पुणे) – सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी येथील समाधीस्थळी २३ जुलै या दिवशी कोरोनाचे सर्व नियम पाळून गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

या वेळी प.पू. बाबांचे सुपुत्र पू. नंदू कसरेकर यांच्या हस्ते प.पू. बाबांच्या समाधीवर अभिषेक करण्यात आला. व्यासपूजन आणि सत्यनारायण पूजाही करण्यात आली. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भंडार्‍याचेही आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनच्या ‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग १)’ या चैतन्यदायी ग्रंथाचे प्रकाशन पू. (श्रीमती) जीजी (प.पू. बाबांच्या पत्नी) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प.पू. बाबांच्या भक्त शीतल ठुसे यांनी केले. प.पू. भक्तराज महाराज निर्देशित भावार्थांचे लेखन प.पू. बाबांचे भक्त कै. चंद्रकांत (दादा) दळवी यांनी केले, तर त्यास कै. दळवी यांच्या कन्या तथा प.पू. बाबांच्या भक्त सौ. उल्का बगवाडकर यांनी साहाय्य केले.

प.पू. बाबांच्या संदर्भातील ग्रंथांच्या प्रकाशनासाठी डॉ. जयंत आठवले आणि त्यांच्या पत्नी डॉ. (सौ.) कुंदाताई यांचे मोलाचे सहकार्य लाभले ! – सौ. उल्का बगवाडकर

याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना सौ. उल्का बगवाडकर म्हणाल्या, ‘‘या ग्रंथाचे प्रकाशन करण्यासाठी डॉ. जयंत आठवले आणि त्यांच्या पत्नी डॉ. (सौ.) कुंदाताई यांनी मोलाचे साहाय्य केले. त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. माझ्या वडिलांच्या (कै. दादा दळवी यांच्या) ग्रंथाचे प्रकाशन गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या समाधीस्थळी करण्याचे भाग्य मला मिळाले, हा सुवर्णक्षणच आहे.’’