कोल्हापुरात अतीवृष्टीने पूरसदृष्य स्थिती : कोल्हापूर-गगनबावडा, रत्नागिरी महामार्गासह अनेक रस्ते बंद !

अलमट्टी धरणातून ९७ सहस्र क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

रामानंदनगर परिसरातून वाढलेल्या पाण्यातून बाहेर जातांना नागरिक

कोल्हापूर, २२ जुलै (वार्ता.) – कोल्हापुरात अतीवृष्टीने पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. २२ जुलैला सकाळी १० वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे पाण्याची पातळी ३७ फूट २ इंच इतकी झाली असून २३ जुलैला ही पातळी ४३ फूट गाठण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे. कोल्हापूर-गगनबावडा हा राज्यमार्ग, तर कोल्हापूर-रत्नागिरी हा महामार्ग बंद झाला आहे. रत्नागिरी मार्ग बंद झाल्याने कोकणकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. पुराचा धोका लक्षात घेता कर्नाटकातील आलमट्टी धरणातून ९७ सहस्र क्युसेक्स (घनफूट प्रतिसेकंद विसर्ग) चालू करण्यात आला आहे.

पुराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने पंचगंगा नदीवर काही ठिकाणी लावलेले बॅरॅकेट्स

अन्य घडामोडी

रामानंदनगर परिसरातून वाढलेल्या पाण्यातून बाहेर जातांना नागरिक

१. शहरातील रामानंदनगर परिसरामध्ये ओढ्याचे पाणी वाढल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले. २२ जुलैला सकाळपासूनच या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम चालू आहे; परंतु पुष्कळ विनंती करूनही काही नागरिक घराबाहेर पडण्यास सिद्ध नव्हते. आमदार ऋतुराज पाटील यांनी लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले. जरगनगर परिसरात रामानंदनगर, जाधव पार्क या भागात सुमारे ५० सहस्र नागरिक रहातात. या उपनगर परिसरात जाण्या-येण्यासाठी रामानंदनगर जवळ नव्याने बांधलेल्या पुलावर पाणी आल्याने या परिसराशी शहराचा संपर्क तुटला आहे.

रामानंदनगर परिसरातून नागरिकांना बाहेर काढतांना आपत्कालीन सेवेतील जवान

२. जिल्ह्यातील ३९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चंदगड, आजरा, कोवाड या भागात अतीवृष्टी झाली आहे. यामुळे परिसरातील नद्यांची पाणीपातळी वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

३. कासारी नदीच्या पाणी पात्रात वाढ झाल्याने बर्की गावात जाणार्‍या पुलावर पाणी आले असून बर्की गावचा संपर्क तुटला आहे.

४. कोल्हापूर जिल्ह्यासाठी एन्.डी.आर्.एफ्.ची २ पथके पुण्याहून कोल्हापूरकडे रवाना झाली आहेत. एका पथकामध्ये २५ सैनिक आहेत.

५. कुंभी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सांगरूळच्या पश्‍चिम भागातील डोंगर भागातील वाड्या-वस्त्यांमध्ये असलेल्या अनेक ओढ्यांना पूर आला आहे.