१. परात्पर गुरु डॉ. आठवले सत्संगात ‘गुरु कसे असावेत ?’, याविषयी सांगणार असल्याचे आम्हाला न सांगताच समजणे
‘वर्ष २००४ मध्ये नाशिक येथे ‘सर्व संप्रदाय’ मेळावा होता. या मेळाव्यासाठी एका संतांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना नाशिक येथे येण्यास आमंत्रण दिले होते. आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांना कार्यक्रमस्थळी पोचवण्यासाठी गेलो होतो. कार्यक्रम चालू झाल्यावर आम्ही घरी जायला निघालो; परंतु काही वेळ कार्यक्रमाच्या स्थळी अनावश्यक रेंगाळत राहिलो. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर बाहेर आले. ते पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. ते आम्हाला म्हणाले, ‘‘चला, नियोजन झाले. साधकांना सत्संगाला बोलावून घ्या.’’ हे सर्वच अत्यंत वेगाने घडले. नंतर सत्संग चालू झाला. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर सत्संगात ‘गुरु कसे असावेत ?’, याविषयी सांगतील हे न सांगता आम्हाला समजले.
२. ‘परात्पर गुरु डॉक्टरांना ‘धर्मा’विषयी बोलण्याचा अधिकार नाही’, अशी शंका तेथील तथाकथित संतांनी घेतल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संतांचा अनादर न करता कार्यक्रम आटोपता घेणे आणि बहुमूल्य वेळ साधकांना देणे
नंतर आम्हाला समजले, ‘एका संतांनी संप्रदाय मेळाव्यात ‘धर्म’ या विषयावर परात्पर गुरु डॉक्टरांना बोलायची विनंती केली आणि ते बोलायला उभे राहिले. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टरांना ‘धर्मा’विषयी बोलण्याचा अधिकार नाही’, अशी शंका तेथील जटा, दाढी, मिशा आणि भगव्या कपड्यात असणार्या संतांनी घेतली. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्या मतांचा अनादर न करता त्यांचे बोलणे त्याच क्षणी आटोपते घेतले आणि त्यांचा बहुमूल्य वेळ साधकांना दिला.’
– श्री. मुकुंद ओझरकर, नाशिक (२३.३.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |