२२ जुलै १९३१ या दिवशी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये वासुदेव बळवंत गोगटे या बाणेदार युवकाने मुंबई भागाचा गृहमंत्री हॉटसन याच्यावर गोळ्या झाडल्या. हॉटसन येथे एका कार्यक्रमास पाहुणा म्हणून आला होता. सोलापूरमधील हत्याकांडास कारणीभूत असणार्याला हॉटसनने पाठीशी घातले होते. याचीच चीड येऊन वासुदेव बळवंत गोगटे या तेजस्वी तरुणाने वरील धाडसी कृत्य केले. आज या घटनेस ९० वर्षे पूर्ण होत आहेत. या राष्ट्रप्रेमी युवकाचे स्मरण करण्याचा अल्पसा प्रयत्न या लेखातून केला आहे.
४ दिवस स्वातंत्र्य उपभोगणारे सोलापूर हे देशातील एकमेव शहर !
म. गांधींना गुजरातमध्ये काराडी या गावी ४ मे १९३० या दिवशी अटक झाल्यानंतर सोलापुरात निदर्शने झाली. त्यामध्ये २१ वर्षांचा शंकर शिवदारे हा तरुण हातात तिरंगा झेंडा घेऊन कलेक्टरच्या (जिल्हाधिकार्यांच्या) दिशेने धावला. त्याच्यामुळे कलेक्टरच्या जिवाला धोका असल्याचे वाटल्याने सार्जंट हॉल याने त्याच्यावर गोळी झाडली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला अन् तो पहिला हुतात्मा ठरला. संतप्त जमावाने पेठ पोलीस चौकी आणि रविवार पेठेतील न्यायालय जाळून टाकले. जमावाने रुद्रावतार धारण केल्यामुळे दुय्यम अधिकार्यांनी सोलापुरातून काढता पाय घेतला. त्यामुळे ९ मे ते १२ मे १९३० हे ४ दिवस स्वातंत्र्य उपभोगणारे सोलापूर देशातील एकमेव शहर ठरले.
लष्करी कायदा लागू करून सोलापुरातील जनतेवर अनन्वित अत्याचार
१३ मेपासून सोलापूरमध्ये ‘लष्करी कायदा’ (मार्शल लाँ) लावण्यात आला आणि ३० जूनपर्यंत त्याची कार्यवाही केली गेली. त्या काळात इंग्रज सरकारने जनतेवर मोठा जुलूम केला. ‘मार्शल लॉ’च्या काळात निरपराध्यांची धरपकड, स्त्रियांवर अत्याचार, सैनिकांकडून लूटमार इत्यादी प्रकार घडले. वर्ष १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडालाही लाजवतील, असे प्रकार सोलापुरात घडले. सोलापुरातील ‘कर्मयोगी’ साप्ताहिकाचे संपादक राजवाडे यांनाही कारवाईला तोंड द्यावे लागले. प्रामुख्याने मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, अब्दुल कुर्बान आणि जगन्नाथ शिंदे यांच्यावर २ पोलिसांच्या हत्येचा आरोप लावला गेला. त्यांना १२ जानेवारी १९३१ या दिवशी म्हणजे सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेच्या पहिल्या दिवशी फाशी देण्यात आली. इंग्रजांच्या साम्राज्य सत्तेने सोलापूर प्रकरणावर जातीय दंग्याचा शिक्का मारून ते दडपून टाकले आणि देशासमोर येऊ दिले नाही. याची कल्पना खुद्द गांधीजींनाही अखेरपर्यंत आली नाही.
सोलापुरातील हत्याकांडास कारणीभूत असणार्याला पाठीशी घालणारा हॉटसन
सोलापुरात झालेले हत्याकांड हे सोलापूरचा ‘डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हेन्री नाईट’ याच्या भ्याडपणामुळे झाले होते. त्याला पाठीशी घालत होता मुंबई भागाचा गृहमंत्री जॉन बटरी अर्नेस्ट हॉटसन ! यांच्यात नातेसंबंधही होते. त्यामुळे हेन्रीच्या चौकशीची मागणी फेटाळली आणि परिस्थिती योग्य हाताळल्याविषयी त्याचे कौतुक केले गेले. दैनिक ‘केसरी’मधून ‘सरकारचे डोळे आणि कान दोन्ही फुटले आहेत काय ?’, असा अग्रलेख लिहिण्यात आला. हॉटसनने तर फाशीची शिक्षा झालेल्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कह्यात देण्याची मागणीही फेटाळली. या सर्व कामाचा मोबदला म्हणून इंग्लंड सरकारने त्यास ‘के.सी.एस्.आय.’ या सन्मानाने सन्मानित केले. याच हॉटसनवर वासुदेव बळवंत गोगटे यांनी गोळ्या झाडल्या.
वासुदेव बळवंत गोगटे यांना प्रेरित करणारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट !
या प्रकरणाच्या अगोदर गोगटे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या रत्नागिरीत चाललेल्या सामाजिक कार्याच्या आकर्षणातून त्यांची भेट घेतली होती. त्या वेळी गोगटे यांनी सावरकर यांना विचारले की, आम्ही कोणत्या मार्गाने देशसेवा करावी ? यावर सावरकर म्हणाले, ‘‘तात्यासाहेब केळकर यांसारखे संपादक व्हायचे कि भगतसिंग-राजगुरू यांप्रमाणे हुतात्मा व्हायचे, हे प्रथम निश्चित करा. वधस्तंभावरून केलेल्या ‘वन्दे मातरम्’च्या गर्जनेने होणारी राजकीय जागृती १० काँग्रेस अधिवेशनांपेक्षा श्रेष्ठ आहे.’’ संभाषणाच्या ओघात सावरकर यांनी अनंत कान्हेरे यांचे उदाहरण दिले. त्याचप्रमाणे मदनलाल धिंग्रा यांच्या निवेदनातील वाक्ये म्हणून दाखवली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र, प्रत्यक्ष दर्शन आणि स्फूर्तीदायक विचार यांनी प्रभावित होऊन गोगटे यांनी ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी आत्मार्पण करावे’, असे ठरवले.
गोगटे यांच्यातील राष्ट्रप्रेम आणि धैर्य यांचे दर्शन घडवणारा क्षण !
त्याप्रमाणे नियतीने गोगटे यांच्या जीवनात तो क्षण आणला. २२ जुलै १९३१ या दिवशी एका समारंभासाठी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजने हॉटसन याला बोलावले होते. ही संधी साधून गोगटे यांनी महाविद्यालयाच्या वाडिया लायब्ररीमध्ये हॉटसनवर २ गोळ्या झाडल्या आणि सोलापूरला ‘मार्शल लॉ’ पुकारणार्याचा सूड घेतला. हॉटसन यांनी चिलखत घातल्यामुळे ते वाचले आणि गोगटे यांच्यावर खटला होऊन त्यांना ७ वर्षांची शिक्षा झाली. या घटनेसंदर्भात म. गांधींनी एक पत्र काढून बोलावलेल्या अतिथीवर आक्रमण केल्याचा निषेध केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मात्र रत्नागिरीत आध्यात्मिक प्रवचनाचे निमित्त करून गोगटे यांचे समर्थन केले.
काँग्रेस सोडून हिंदू सभेत प्रवेश केल्याने गोगटे यांची उपेक्षा !
यानंतर गोगटे ७ वर्षांची शिक्षा भोगून सुटले आणि त्यांनी ‘लॉ कॉलेज’मध्ये अधिवक्ता होण्यासाठी प्रवेश घेतला. त्यावेळेस ते काँग्रेसचे सभासद होते आणि ते खादी वापरत. महाविद्यालयाच्या एका समारंभासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मुख्य पाहुणे म्हणून बोलावण्यासाठी ते कॉलेजचे जिमखानाप्रमुख र.बा. फडके यांच्यासह केसरीवाड्यात गेले. प्रथम सावरकर यांनी गोगटे यांना ओळखले नाही. तेथील ज.स. करंदीकर यांनी हे ‘हॉटसन गोगटे’ म्हणून ओळख करून दिली. ‘हॉटसन गोगटे’ म्हणताच सावरकर खुर्चीतून उठून म्हणाले, ‘‘अरे गोगटे, एक वेळ मी तुला विसरलो असेन; पण तुला इतिहास कधीच विसरणार नाही. तुझे दिव्य कृत्य इतिहासात अमर राहील. तू काँग्रेसमध्ये किंवा कुठेही असलास, तरी तू मला जवळचा आहेस.’’ त्यानंतर १९३८ – १९३९ या वर्षी भागानगर चळवळीची काँग्रेसची भूमिका न पटल्याने त्यांनी १९३९ मध्ये काँग्रेस सोडून हिंदू सभेत प्रवेश केला. त्यामुळे गोगटे काँग्रेसच्या दृष्टीने अस्पृश्य ठरले. त्यांच्या धाडसी कृत्याचे कौतुक झाले नाही. आज तर ते विस्मरणातच गेले आहेत.
सावरकर यांच्या विरोधात खोटी साक्ष देण्यासाठी दबाव आणल्यावर वासुदेव गोगटे यांनी बाणेदारपणे दिलेले उत्तर
त्यानंतर वासुदेव गोगटे हिंदू सभेचे म्हणून गांधीवधाच्या अभियोगात त्यांनाही अटक झाली. त्यांच्यावर सावरकरांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्या वेळी गोगटे म्हणाले, ‘‘तुम्ही सावरकरांना बळजोरीनेच गोवले आहे. तुम्ही सावरकरांचे थडगे रचत आहात आणि मला त्यावर दगड रचायला सांगत आहात. ते कालत्रयी शक्य होणार नाही. मी ब्रिटिशांच्या कैदेत ७ वर्षे काढलेली व्यक्ती आहे.’’
॥ जय जय रघुवीर समर्थ ।।
– श्री. विद्याधर नारगोलकर, अध्यक्ष, पुणे सार्वजनिक सभा