मंत्रीमंडळात फेरपालट करण्याचा विचार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

डॉ. प्रमोद सावंत

पणजी – गोव्याच्या मंत्रीमंडळात कोणताही पालट नजीकच्या काळात होणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी देहलीहून आल्यानंतर स्पष्ट केले. मुख्यमंत्री १९ जुलैला देहली दौर्‍यावर होते. राज्यातील नेतृत्वात पालट होईल किंवा किमान मंत्रीमंडळामध्ये तरी पालट होईल, अशी चर्चा होती. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी विमानतळावर गाठून विचारले असता ते म्हणाले, ‘‘राज्यातील अनेक विषय मार्गी लावण्यासाठी हा दौरा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या गाठीभेटी या दौर्‍यात घेतल्या. याचा लाभ राज्याचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी होणार आहे. मंत्रीमंडळात फेरपालट करण्याचा विषय विचाराधीन नाही आणि देहलीत या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही.’’

सायंकाळी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोव्यातील लसीकरणाच्या प्रक्रियेची, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी केलेल्या पूर्वसिद्धतेची, तसेच गोव्यातील ८५ टक्के नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात आल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे गोव्यातील काही विकासकामांच्या उद्घाटनांसाठी त्यांना निमंत्रित केले आहे.

पर्यावरण आणि वन मंत्री भूपेदरसिंह यादव यांची भेट घेऊन गोव्यात वाळू उत्खननास अनुमती देण्याविषयी, तसेच बहुतांश गावे पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रातून वगळण्याविषयी विनंती करण्यात आली आहे.’’