मुंबईतील काही ठिकाणांना यापूर्वीच देण्यात आले आहे क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव !

भाजपच्या पाठिंब्यानेच टिपू सुलतान याचे नाव दिल्याचे महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांचे स्पष्टीकरण

राजकारण आणि पक्षीय मतभेद बाजूला ठेवून हिंदुत्वाच्या सूत्रावर शिवसेना अन् भाजप यांनी ठाम भूमिका घ्यावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे, तसेच यापूर्वी मुंबईतील ज्या ठिकाणांना क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव देण्यात आले आहे, ती नावे त्वरित पालटून आक्रमकांचे उदात्तीकरण रोखावे, असे प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाला वाटते !

मुंबई, १८ जुलै (वार्ता.) – गोवंडी येथील उद्यानाला क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव देण्याला झालेल्या विरोधानंतर हा प्रस्ताव पुन्हा मागे पाठवण्यात आला असला, तरी मुंबईतील काही ठिकाणांना यापूर्वीच टिपू सुलतान या क्रूरकर्म्याचे नाव देण्यात आले आहे. गोवंडी (एम्/पूर्व) येथील एका रस्त्याला टिपू सुलतान याचे नाव वर्ष २०१३ मध्ये देण्यात आले आहे, तसेच मुंबईतील अन्यही ठिकाणांना टिपू सुलतान याचे नाव देण्यात आले आहे. ही नावे भाजपच्याच पाठिंब्यानेच देण्यात आली आहेत, अशी माहिती महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी १६ जुलै या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

वर्ष २०१३ मध्ये तत्कालीन नगरसेवक मोहमद सिराज शेख यांनी गोवंडी येथील बाजीप्रभु देशपांडे मार्गापासून ते रफीनगर नाल्यापर्यंत जाणार्‍या रस्त्याचे नामकरण ‘शहीद टिपू सुलतान’ असे करण्याचा प्रस्ताव दिला होता. तो स्थापत्य समितीने संमत केला असून टिपू सुलतान याच्या नावाला भाजपचे तत्कालीन नगरसेवक अमित साटम यांनी अनुमोदन दिले होते, याविषयी महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत कागदपत्रे दाखवली.

…तर महापौरांच्या विरोधात ५० कोटी रुपयांचा अब्रूहानीचा दावा प्रविष्ट करणार ! – आमदार अमित साटम, भाजप

अमित साटम आणि सौ. किशोरी पेडणेकर

वर्ष २०१३ मध्ये भाजपचा नगरसेवक असतांना मी स्थापत्य समितीवर कधीच सदस्य नव्हतो. त्यामुळे गोवंडी येथील रस्त्याला टिपू सुलतान याचे नाव देण्याविषयी अपक्ष नगरसेवकाने केलेल्या प्रस्तावाला मी अनुमोदन देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महापौरांनी माझे नाव गोवले आहे, याचा मी निषेध करतो. महापौरांनी येत्या ७ दिवसांत या प्रकरणातील अधिकृत कागदपत्रे सादर करून तसे सिद्ध न केल्यास त्यांच्या विरोधात ५० कोटी रुपयांचा अब्रूहानीचा दावा प्रविष्ट करणार आहे.

१५ जुलै या दिवशी झालेल्या बाजार आणि उद्यान समितीच्या सभेत समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दिकी यांचा गोवंडी येथील उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्याचा प्रस्ताव चर्चेला आला होता. भाजपने टिपू सुलतान याच्या नावाला तीव्र विरोध केला, तर उद्यानाचे काम अपुरे असल्याने प्रस्ताव पुनर्विचारासाठी पाठवण्याची भूमिका शिवसेनेने घेतली. भाजपने प्रस्ताव रहित करण्याची मागणी केली; मात्र बाजार आणि उद्यान समितीच्या अध्यक्षांनी भाजपच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. यावरून भाजप आणि शिवसेना यांमध्ये सध्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.