महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा बदलापूर (जिल्हा ठाणे) येथील चि. अन्विथ जयेश शिंदे (वय १ वर्ष ६ मास) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील अन्विथ जयेश शिंदे एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बदलापूर (जिल्हा ठाणे) येथील चि. अन्विथ जयेश शिंदे (वय १ वर्ष ६ मास) याची २४ जानेवारी २०२१ या दिवशी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित केली होती. त्यानिमित्त चि. अन्विथ याची आई आणि आजी यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

चि. अन्विथ जयेश शिंदे

१. जन्मापूर्वी

सौ. प्राजक्ता जयेश शिंदे

१ अ. मुलीला विवाहानंतर ३ वर्षे मूल न होणे, रामनाथी आश्रमात जाऊन आल्यानंतर २ मासांनी मुलीला गर्भधारणा झाल्याचे समजणे आणि ‘गुरुदेवांच्या कृपेमुळे त्रास दूर झाले’, असे जाणवणे

‘माझी मुलगी सौ. प्राजक्ता हिचा विवाह होऊन ३ वर्षे झाली, तरी तिला बाळ झाले नव्हते. तिची मासिक पाळी अनियमित येत असे; म्हणून मला काळजी वाटायची. फेब्रुवारी २०१९ मध्ये माझा मुलगा, सून, मुलगी, जावई, असे आम्ही सर्व जण रामनाथी आश्रमात गेलो होतो.

२४.४.२०१९ या दिवशी ती गरोदर असल्याची तिने आनंदाची बातमी दिली. त्या क्षणीच गुरुमाऊलींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. ‘गुरुदेव आपल्याला किती सांभाळतात ?’, याची मला जाणीव झाली. ‘गुरुदेवांच्या कृपेमुळे त्रास दूर झाले’, असे मला जाणवले.’

– सौ. पल्लवी प्र. लांजेकर (चि. अन्विथची आजी, आईची आई), राजापूर, जिल्हा रत्नागिरी.

१ आ. कोणतेही उपचार न घेता गर्भधारणेचा अहवाल सकारात्मक येणे आणि ‘ही देवाने दिलेली भेट आहे’, असे वाटून कृतज्ञता व्यक्त होणे

‘माझी मासिक पाळी अनियमित येत असे. त्यामुळे मला गरोदरपणाचे दडपण होते. ‘मला बाळ होईल कि नाही ?’, याची काळजी वाटायची. ‘कोणते उपचार घ्यावे लागतील ?’, ही भीतीसुद्धा माझ्या मनात होती; परंतु प.पू. गुरुदेवांच्या कृपेने २४.४.२०१९ या दिवशी मी गरोदर असल्याचे निदान झाले. कोणतेही उपचार न घेता अहवाल (रिपोर्ट) सकारात्मक मिळाला. तेव्हा माझ्या मनात पहिलाच विचार आला, ‘ही मला देवाने दिलेली भेटच आहे’ आणि माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.

१ इ. गरोदरपणात मी प्रतिदिन दुर्गाकवच आणि गणपति स्तोत्र ऐकत होते. सातव्या मासात प्रतिदिन मी बगलामुखी कवच ऐकायचे.

१ ई. ‘मला मुलगा झाला, तर श्रीकृष्णासारखा असू दे आणि मुलगी असेल, तर श्री महालक्ष्मी देवीसारखी असू दे’, अशी मी प्रार्थना करत असे.’

– सौ. प्राजक्ता जयेश शिंदे (चि. अन्विथची आई), बदलापूर, जिल्हा ठाणे.

१ उ. मुलीने गरोदरपणात सात्त्विक आहार घेणे

‘गरोदरपणामध्ये मुलीला फळे, दूध आणि शाकाहारी जेवणच जेवावेसे वाटत होते. ती मांसाहार करत नव्हती. तिला मांसाहार करावासा वाटत नव्हता. तेव्हा माझ्या मनात विचार यायचा, ‘येणारा जीव सात्त्विक असणार.’ – सौ. पल्लवी लांजेकर

सौ. पल्लवी प्रमोद लांजेकर

२. जन्मानंतर

२ अ. जन्म ते ३ मास

२ अ १. ‘६.१२.२०१९ या दिवशी चि. अन्विथचा जन्म झाला. तो जन्मला, तेव्हा त्याच्या हातांच्या मुद्रा होत्या. पुष्कळ वेळा झोपतांना त्याच्या हातांच्या मुद्रा असायच्या.’ – सौ. प्राजक्ता जयेश शिंदे

२ अ २. ‘जन्मानंतर बाळ पुष्कळ तेजस्वी दिसत होते.’ – सौ. पल्लवी प्र. लांजेकर

२ अ ३. गरोदर असतांना घरातील वातावरण तणावपूर्ण असूनही ईश्वराच्या कृपेने बाळ गोंडस आणि हसरे होणे : ‘माझ्या सासरी कुणी साधना करणारे नाहीत. त्यामुळे काही वेळा घरातील वातावरण तणावपूर्ण असायचे. ‘अशा वातावरणाचा गर्भातील बाळावर परिणाम होतो’, असे म्हणतात; परंतु ईश्वराच्या कृपेने बाळ गोंडस आणि हसरे झाले. अन्विथ अनोळखी लोकांकडे पाहूनही आपलेपणाने हसतो.’ – सौ. प्राजक्ता जयेश शिंदे

२ अ ४. जन्मानंतर ६ व्या दिवशी परात्पर गुरुदेवांचा जन्मोत्सवानिमित्तचा नाडीवाचनाचा कार्यक्रम बाळाने शांतपणे पहाणे : ‘आम्ही बाळाला ५ व्या दिवशी घरी आणले आणि दुसर्‍याच दिवशी परात्पर गुरुदेवांचा जन्मोत्सवानिमित्त नाडीवाचनाचा कार्यक्रम होता. तेव्हा मी बाळाला मांडीवर घेऊन कार्यक्रम पहात होते. बाळाने ४५ मिनिटे तो कार्यक्रम पाहिला. त्या वेळी तो जराही रडला नाही. त्याने तो कार्यक्रम शांतपणे पाहिला.’ – सौ. पल्लवी प्र. लांजेकर

२ अ ५. घरातील कामे करायची असतांना चि. अन्विथ झोपत असल्याने कामे नीट करता येणे : ‘तो १ मासाचा असतांना माझ्या आई-वडिलांना कामासाठी गावी जावे लागले. त्यामुळे घरातील सर्व कामे मला करावी लागणार होती. त्यात माझे शस्त्रकर्म झाले होते आणि टाकेही सुकले नव्हते. माझ्या मनावर ताण आला होता, ‘बाळाला सांभाळून काम कसे करणार ?’; पण जेव्हा मला काम करावे लागायचे, तेव्हा तो झोपायचा. त्यामुळे माझी कामे नीट व्हायची.

२ अ ६. बाजारात जाण्यापूर्वी देवाला ‘तूच बाळाचा सांभाळ कर’, अशी प्रार्थना करणे आणि बाजारातून येईपर्यंत बाळ शांतपणे झोपणे : तो ३ मासांचा असतांना एकदा गावी असतांना मला आणि आईला बाजारात जावे लागले. ‘वडिलांना वयोमानामुळे अन्विथला सांभाळायला जमेल का ?’, असा विचार माझ्या मनात आला. तेव्हा मी जातांना देवाला प्रार्थना केली, ‘देवा, तूच माझ्या बाळाचा सांभाळ कर.’ आश्चर्य म्हणजे आम्ही गेल्यावर तो झोपला. आम्ही बाजारातून येईपर्यंत तो झोपलेलाच होता. इतर दिवशी तो एवढा कधीच झोपत नसे.’

– सौ. प्राजक्ता जयेश शिंदे

२ आ. वय ४ मास

२ आ १. सात्त्विक गोष्टींची आवड : ‘अन्विथ भिंतीवर असलेल्या पंचांगाकडे झेप घेई. तो आकाशकंदिलाकडे एकटक पहात असे.

२ आ २. तो बगलामुखी स्तोत्र लावल्यावर मोठमोठ्याने ओरडत हात-पाय हालवत असे. त्या वेळी ‘तो सूक्ष्मातून युद्ध करत आहे’, असे वाटायचे.

२ आ ३. अन्विथचे आजोबा श्री. प्रमोद लांजेकर (यांची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के आहे.) हे अन्विथला मांडीवर घेऊन नामजपाला बसायचे. तेव्हा तो शांतपणे देवाकडे बघत असायचा.

२ इ. वय ५ ते ८ मास

२ इ १. चि. अन्विथने पाहिल्यावर आध्यात्मिक लाभ होत असल्याचे जाणवणे : मी त्याला झुल्यामध्ये ठेवून झोपवत असे. तेव्हा कधी कधी तो माझ्याकडे एकटक पहात असे. त्या वेळी मला जांभया येत असत. त्या वेळी ‘मला आध्यात्मिक लाभ होत आहे’, असे मला जाणवायचे. तेव्हा तो ५ मासांचा होता.’ – सौ. पल्लवी प्र. लांजेकर

२ इ २. देवाची ओढ : ‘आठव्या मासापासून तो कधी रडायला लागल्यावर त्याला देवाच्या जवळ नेले, तर तो लगेच शांत होतो आणि देवाकडे बघत बसतो. ‘तो त्याच्या भाषेत देवाशी बोलतो’, असे वाटते.’ – सौ. प्राजक्ता जयेश शिंदे

२ इ ३. ‘आठव्या मासात बोलायला लागल्यावर त्याने प्रथम ‘बाबा’ आणि नंतर ‘आबा’ हे शब्द उच्चारले. प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पाहून तो ‘आबा, आबा’, असे म्हणतो.

चि. अन्विथने आतापर्यंत आम्हाला कसलाच त्रास दिला नाही. देवाने असे आनंदी बाळ दिल्याविषयी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. पल्लवी प्र. लांजेकर (डिसेंबर २०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यू ट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.