हिंगोली – औंढा तालुक्यातील आसोला येथे पुराच्या पाण्यामध्ये चारचाकी वाहून गेल्याने पत्नी आणि मुलगा यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पती योगेश पडोळ यांच्याविरुद्ध १४ जुलै या दिवशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संभाजीनगर येथील योगेश पडोळ, त्यांची पत्नी वर्षा, मुलगा कु. श्रेयन आणि मावस मेव्हणा रामदास शेळके हे ११ जुलैच्या रात्री ९.३० वाजता चारचाकीने प्रवास करत होते. आसोला येथील ओढ्याला पूर आल्यानंतरही त्यातून चारचाकी बाहेर काढण्याचा प्रयत्न चालक योगेश पडोळ यांनी केला; मात्र चारचाकी ओढ्याच्या पुरात मधोमध अडकून पडली. योगेश आणि रामदास यांनी झाडाचा आसरा घेतला, तर वर्षा आणि श्रेयन हे दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. १२ जुलै या दिवशी त्यांचे मृतदेह सापडले. या प्रकरणात रामदास शेळके यांनी १४ जुलै या दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. ‘योगेश पडोळ यांनी पुराच्या पाण्यातून चारचाकी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच दोघांचा मृत्यू झाला आहे’, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी योगेश यांच्यावर गुन्हा नोंद केला.