सातारा, १६ जुलै (वार्ता.) – सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरणाजवळ अतिदुर्गम भागात वसलेल्या सायळी या गावातील सैनिक नाईक संतोष देवरे हे ४ मराठा लाईफ इंन्फंट्रीमधून नुकतेच निवृत्त झाले. गावातील माजी सैनिक होण्याचा पहिला मान त्यांना मिळाल्याने ग्रामस्थांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले.
सैनिक संतोष देवरे गावात येताच ग्रामस्थांनी कोरोनाचे नियम पाळत देवरे यांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून महिला आणि पुरुष यांनी देवरे यांच्यावर पुष्पवृष्टी केली. देवरे यांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेतले. या वेळी ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
जिल्ह्यातील काही गावांतील प्रत्येक घरातील एक व्यक्ती सैन्यामध्ये भरती असल्याने सातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सैनिक निवृत्त झाल्यानंतर गावात येतात तेव्हा ग्रामस्थ त्यांचे भरभरून स्वागत करतात.