‘वर्ष २०२० मध्ये कोरोना महामारीच्या कारणास्तव दळणवळण बंदी असल्यामुळे प्रतिवर्षीप्रमाणे सभागृहात प्रत्यक्षपणे गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करणे शक्य नव्हते, तरीही परात्पर गुरुदेवांच्या कृपेने ‘साधक आणि जिज्ञासू यांना या दिवशी कार्यरत असलेल्या गुरुतत्त्वाचा अधिकाधिक लाभ व्हावा’, यासाठी ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. या सेवा करतांना साधकांना अनेक अडचणी आल्या. त्या अडचणींचे स्वरूप तांत्रिक वाटत असले, तरीही तांत्रिकदृष्ट्या अनुभवी आणि प्रशिक्षित साधकांनी सर्व प्रयत्न करूनही त्यांवर काही उपाय सापडत नव्हते. स्थुलातून तांत्रिक वाटणार्या अडचणी साधकांनी रामनाथी आश्रमात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांना सांगितल्या. सद्गुरु काकांनी सूक्ष्म परीक्षण करून साधकांना नामजपादी उपाय करायला सांगितले आणि काही वेळा त्यांनी स्वतःच उपाय केले. त्यामुळे सेवेतील अडचणी दूर झाल्या आणि सर्व कार्यक्रम होऊ शकले.
१६ जुलै २०२१ या दिवशीच्या अंकात या संदर्भातील काही अनुभूती आपण पाहिल्या. आज या नामजपादी उपायांचे साधकाने अनुभवलेले दिव्यत्व पाहूया.
१. सेवेचा पूर्वानुभव असतांनाही सेवेत अडचणी येणे आणि सद्गुरु काकांनी उपाय केल्यावर अडचणी सुटणे
‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व साधकांना ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहाता यावा’, यासाठी तांत्रिक सेवांच्या समन्वयाच्या काही सेवांचे दायित्व माझ्याकडे होते. मला या सेवेचा पूर्वानुभव होता; पण या वेळी प्रत्यक्ष सेवा करतांना अडथळे येऊ लागले आणि सेवा पूर्ण व्हायला नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ लागत होता. आम्हाला काही तांत्रिक अडचणींवर उपाय सापडत नव्हते. त्यामुळे नियोजनात अडचणी येऊ लागल्या. या सर्व सूत्रांचा परिणाम पुढील सेवांवर होऊन ‘सर्व सेवा वेळेत पूर्ण होण्यात अडचणी येतील’, अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली. त्या वेळी आम्ही सद्गुरु गाडगीळकाकांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी नामजपादी उपाय केले आणि त्यानंतर अडचणी सुटल्याचे लक्षात आले.
२. सेवेतील तांत्रिक सूत्र अनुभवी साधकाच्या लक्षात न येणे, सद्गुरु काकांनी नामजपादी उपाय केल्यावर ते सूत्र साधकाच्या लक्षात येणे आणि ती सेवा पूर्ण होणे
एका सेवेसाठी एका साधकाचे नियोजन केले होते. त्या साधकाला या क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असूनही आणि त्या साधकाने बराच वेळ प्रयत्न करूनही त्या सेवेतील तांत्रिक सूत्र त्याच्या लक्षात येत नव्हते. जेव्हा सद्गुरु काकांनी नामजपादी उपाय करून अडथळा दूर झाल्याचे सांगितले, तेव्हा ते सूत्र त्या साधकाच्या लगेच लक्षात आले. जवळपास दोन दिवस जी सेवा एकाच टप्प्याला अडकली होती, ती लगेच पुढच्या टप्प्याला गेली.
३. सेवेचा वेग नेहमीपेक्षा अल्प होणे आणि सद्गुरु काकांनी उपाय केल्यावर सेवेचा वेग वाढून ती सुरळीत होणे
दुसर्या एका प्रसंगात एका सेवेची गती पुष्कळ अल्प होती आणि अपेक्षित वेळेपेक्षा अधिक वेळ ती सेवा चालू होती, तसेच त्या सेवेत अनुभवी असलेल्या साधकांकडून सेवा करतांना ढोबळ चुका होत होत्या. त्यामुळे अन्य साधकांना अडचणी येत होत्या. याविषयी सद्गुरु काकांना सांगितल्यावर त्यांनी नामजपादी उपाय केले आणि अडथळा दूर झाल्याचे सांगितले. त्यानंतर या सेवेचा वेग वाढला. या सेवेसाठी काही नवीन साधकांना अल्प वेळेत प्रशिक्षित करता आले आणि त्यानंतर ही सेवा सुरळीत चालू झाली.
४. सद्गुरु काकांना सेवेतील अडचण सांगितल्यावर त्यांनी ‘साधकांनी संघभावाने प्रयत्न केल्यास सेवा लवकर पूर्ण होईल’, असे सांगणे आणि साधकांनी संघभावाने प्रयत्न केल्यावर सेवा पूर्ण होणे
अन्य एका प्रसंगात सद्गुरु काकांना सेवेतील अडचण सांगितल्यावर त्यांनी ‘यामध्ये आध्यात्मिक अडथळा नसून साधकांनी संघभावाने प्रयत्न केल्यास सेवा लवकर पूर्ण होईल’, असे सांगितले. त्यानंतर या सेवेतील साधकांनी त्याप्रमाणे प्रयत्न केल्यावर त्यांची मने जुळली. संघभावामुळे ती सेवा अल्प वेळेत पूर्ण झाली आणि सर्वांना त्यातून आनंद मिळाला. तेव्हा ‘सद्गुरु काकांच्या संकल्पानेच ही सेवा होऊ शकली’, असे मला जाणवले.
५. सेवेत येणार्या अडचणींवर नामजपादी उपाय विचारण्याच्या सेवेनिमित्त सद्गुरु काकांच्या संपर्कात आल्यावर नामजपादी उपायांचे महत्त्व मनावर बिंबणे आणि संतांच्या अफाट शक्तीची प्रचीती येणे
गुरुपौर्णिमेच्या कालावधीत माझ्याकडे ‘साधकांच्या अडचणी सद्गुरु गाडगीळकाकांना सांगणे, त्यांनी सांगितलेले नामजपादी उपाय संबंधित साधकांना सांगून त्यांचा पुढील आढावा घेणे’, अशी सेवा होती. त्यामुळे मला अनेक वेळा उपायांचे महत्त्व अनुभवता आले आणि प्रत्येक प्रसंगाच्या माध्यमातून माझ्या मनावर नामजपादी उपायांचे महत्त्व बिंबत गेले. ‘व्यवहारातील अनेक अडचणी वरकरणी जरी स्थुलातील वाटत असल्या आणि त्यांवर स्थुलातील उपाय योग्य वाटत असले, तरी ‘त्यांमागील मूळ कारण आध्यात्मिक कसे असते ? आपण त्यावर स्थुलातून कितीही प्रयत्न केले, तरी काहीच साध्य होत नाही; मात्र नामजपादी उपाय केल्यावरच मार्ग मिळू शकतो’, हे मला शिकता आले. या वेळी मला ‘संतांची शक्ती किती अफाट असते !’, याची प्रचीती आली.
६. पूर्वी नामजपादी उपायांपेक्षा बुद्धीवर अधिक श्रद्धा असणे आणि या सेवेच्या माध्यमातून संत अन् नामजपादी उपाय यांच्यावरील श्रद्धा वाढल्याने कृतज्ञता वाटणे
मी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे आणि अनेक वर्षे तांत्रिक क्षेत्रात नोकरी केली आहे. मी स्वतः एका स्तराला बुद्धीवादी आहे. त्यामुळे माझी नामजपादी उपायांपेक्षा बुद्धीवर अधिक श्रद्धा होती; पण गुरुकृपेने या सेवांसाठी माझे नियोजन झाले आणि या माध्यमातून माझी संत अन् नामजपादी उपाय यांवरील श्रद्धा वाढली. त्यामुळे ‘परात्पर गुरुदेव एका जिवाला अध्यात्मात पुढे घेऊन जाण्यासाठी कशी किमया करतात ?’, याची जाणीव होऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
– श्री. ओंकार कानडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.७.२०२१)
|