सिंधुदुर्ग – जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. १५ जुलैला जिल्ह्यातील आठही तालुक्यांत मिळून सरासरी १५६.७२ मि.मी. पाऊस पडला. १ जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी १ सहस्र ८५३.०३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सतत पडणार्या पावसामुळे जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी नदी, कुडाळ तालुक्यातील कर्ली नदी आणि खारेपाटण येथील वाघोटन नदी या नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्याने प्रशासनाने जनतेला सतर्कतेची चेतावणी दिली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या ४ दिवसांपासून जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
साळगाव येथे अतीउत्साही तरुण वाहून जातांना सुदैवाने वाचले
कुडाळ तालुक्यात झाराप-साळगाव रस्त्यावर भलेमोठे झाड उन्मळून पडल्याने या मार्गावरील वाहतूक ५ घंटे ठप्प झाली होती. साळगाव येथे पुलावरून पाणी वहात असतांनाही दोन अतीउत्साही तरुण दुचाकीने मार्गक्रमक करत होते; मात्र पुलाच्या मध्यभागी गेल्यावर त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. सुदैवाने स्थानिक तरुणांनी त्या दोघांना वाचवले अन्यथा अनर्थ घडला असता.
मालवण तालुक्यातील मसुरे पंचक्रोशीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मसुरे गावात येणार्या सर्व रस्त्यांवर पाणी आल्याने गावात प्रवेश करणे कठीण झाले.
भेडशी येथील पुलावर गाडीसह अडकलेल्या ५ जणांना वाचवण्यात यश
दोडामार्ग – गोवा येथून आंध्रप्रदेश येथे जाणार्या एका वाहनाच्या चालकाला दोडामार्ग-तिलारी मार्गावरील भेडशी येथील कॉजवेवर (लहान पुलावर) आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चालकाने मार्गावरून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पुलावर पाण्याची पातळी अधिक असल्याने चालकासह ५ जण अडकले. येथील ग्रामस्थांना याची माहिती मिळताच युवकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि स्थानिक युवक यांनी गाडीसह या ५ जणांना पाण्याच्या बाहेर काढले. या साहाय्यकार्यात सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ डांगी, रेहान लतीफ, महेंद्र बोंद्रे, गणपत काणेकर, पत्रकार गोविंद शिरसाट, पत्रकार तथा उपसरपंच गणपत डांगी, दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर्.जी. नदाफ यांचा सहभाग होता.
अतीवृष्टीमुळे तिलारी धरणाच्या खळग्यातील दगडी धरणाचे चारही दरवाजे २० ऑगस्टपर्यंत उघडे ठेवणार
तिलारी प्रकल्पाच्या (धरणाच्या) पाणलोट क्षेत्रात अतीवृष्टी होत आहे. त्यामुळे खळग्यातील दगडी धरणाचे चारही दरवाजे २० ऑगस्टपर्यंत पूर्णपणे उघडे ठेवण्यात येणार आहेत. परिणामी तिलारी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे तिलारी नदीवरील सर्व कॉजवे (छोटे पूल) पाण्याखाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेसह दोडामार्गचे तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी. आपत्तीजनक स्थिती उद़्भवल्यास त्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास त्वरित द्यावी, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केली आहे.