गिरी येथील पूरसदृश स्‍थितीची मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी केली पहाणी : शेतकर्‍यांना हानीभरपाई देण्‍याची घोषणा

पणजी, १५ जुलै (वार्ता.) – गेल्‍या कित्‍येक दिवसांपासून पडत असलेला मुसळधार पाऊस आणि राष्‍ट्रीय महामार्गाचे काम यांमुळे गिरी, म्‍हापसा परिसरात पूरसदृश स्‍थिती निर्माण झाली आहे. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १५ जुलै या दिवशी स्‍थानिक आमदार आदींसह गिरी येथे भेट देऊन स्‍थितीची पहाणी केली.

त्‍यानंतर पत्रकारांंना मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्‍हणाले, ‘‘गिरी येथे पूरसद़ृश स्‍थिती झालेल्‍या भागाची जलस्रोत खाते, कृषी खाते, सार्वजनिक बांधकाम खाते आणि संबंधित खाती यांना सर्वेक्षण करण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहेत. पुरामुळे हानी पोचलेल्‍या सर्व शेतकर्‍यांना आवश्‍यक हानीभरपाई देण्‍यात येणार आहे. तार नदीच्‍या परिसराचेही सर्वेक्षण करण्‍यात येणार आहे. यावर तातडीने उपाययोजना करून संबंधितांना साहाय्‍य करण्‍यात येणार आहे, तसेच यावर दीर्घकालीन उपाय करण्‍यावर भर दिला जाणार आहे. पुढील वर्षापर्यंत यावर तोडगा निघालेला असेल.’’

गिरी परिसरात पाणी साचल्‍याने म्‍हापसा येथील तार नदीच्‍या काठावरील शेती आणि हॉटेल ग्रीन पार्क येथील भाग पाण्‍याखाली गेला आहे. गिरी येथे म्‍हापसा शहर आणि राष्‍ट्रीय महामार्ग येथे जाणारा रस्‍ता पाण्‍याखाली गेला आहे. हॉटेल ग्रीन पार्कपासून वेर्ला-काणका येथे जाणारा रस्‍ताही पाण्‍याखाली गेला आहे. मुख्‍यमंत्री

डॉ. प्रमोद सावंत यांनी भेटीच्‍या वेळी मातीचा भराव शेतात टाकल्‍याने ही पूरसदृश स्‍थिती निर्माण झाल्‍याचे म्‍हटले आहे. माती शेतात टाकणार्‍यांवर कारवाई करण्‍याचे आदेश मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलीस यंत्रणा आणि संबंधित विभाग यांना दिले आहेत.

सलग चौथ्‍या दिवशी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्‍कळीत

पणजी – गोव्‍यात सलग चौथ्‍या दिवशी मुसळधार पाऊस पडत असल्‍याने जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. गोव्‍यात गेल्‍या २४ घंट्यांमध्‍ये नेहमीपेक्षा ४ पट अधिक पाऊस पडला आहे. हवामान विभागाने १५ जुलै या दिवसासाठी पूर्वी दिलेली ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ची चेतावणी पालटून ती ‘रेड अ‍ॅलर्ट’ केली होती.

राज्‍यात ५ ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद

राज्‍यात १५ जुलै या दिवशी ११ पैकी ५ ठिकाणी मुसळधार पावसाची (११.५ से.मी.हून अधिक) नोंद झाली आहे, तर उर्वरित ७ ठिकाणी ६ से.मी. ते ११ से.मी. पर्यंत पावसाची नोंद झाली आहे. पेडणे येथे सर्वाधिक म्‍हणजे १९ से.मी. आणि सांगे येथे १८ से.मी. पावसाची नोंद झाली आहे. राज्‍यात आतापर्यंत एकूण १६० से.मी. पावसाची नोंद झाली आहे आणि हा आकडा प्रत्‍येक वर्षीच्‍या सरासरीपेक्षा १४ टक्‍के अधिक आहे. हवामान विभागानुसार राज्‍यात २४ घंट्यांनंतर पाऊस ओसरेल आणि तो १८ जुलैनंतर पुन्‍हा सक्रीय होणार आहे.