पणजी, १५ जुलै (वार्ता.) – गोव्याच्या राज्यपालपदी पी.एस्. श्रीधरन् पिल्लई १५ जुलै या दिवशी शपथबद्ध झाले. पी.एस्. श्रीधरन् पिल्लई हे मिझोरामचे माजी राज्यपाल आणि भाजपचे केरळ विभागाचे माजी अध्यक्ष आहेत. दोनापावला येथील राजभवन येथे पार पडलेल्या सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांनी पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांना राज्यपालपदाची शपथ दिली.
शपथग्रहण सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलतांना राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई म्हणाले, ‘‘राज्याच्या भल्यासाठी सर्वांनी मला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. गोव्यातील पर्यटन अधिकाधिक विकसित करण्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे. म्हादई पाणीतंट्याविषयी माझा अभ्यास नाही; मात्र यावर अभ्यास करून मगच मी भाष्य करीन. नवीन शैक्षणिक धोरण चांगले आहे आणि याची देशाला आवश्यकता आहे.’’ राज्यपालांच्या शपथग्रहण समारंभानंतर पत्रकारांंना मुख्यमंत्री
डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘अनेक मासांनंतर गोव्यासाठी पूर्णकालीन राज्यपाल लाभले आहेत. यामुळे विधीमंडळासंबंधीची कामे जलद गतीने होण्यास साहाय्य होणार आहे. राज्यशासनही विविध गोष्टींत राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांचा सल्ला घेऊ शकणार आहे.’’