|
मुंबई, १५ जुलै (वार्ता.) – महिलांनी स्वत:चे शरीर लपवण्यासाठी, तसेच लज्जेखातर अंतर्वस्त्रांचा वापर करू नये, याविषयी अभिनेत्री हेमांगी कवी यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या ‘बाई, बूब्स आणि ब्रा’ या उथळ ‘पोस्ट’वरून सामाजिक माध्यमांवर चर्चेला ऊत आला आहे. प्रसारमाध्यमांनी या विषयाला वारेमाप प्रसिद्धी दिली आहे. (स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांत भेद असतो. स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा नैसर्गिक अधिकार आहे; मात्र स्वैराचार समाजात विकृती निर्माण करतो. सामाजिक स्वास्थ्यासाठी काही बंधने पाळावी लागतात. याविषयी खरेतर लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेने समाजाचे दिशादर्शन करणे अपेक्षित आहे; मात्र स्वैराचाराचे उदात्तीकरण करणारी पत्रकारिता समाजाला काय दिशादर्शन करणार ? – संपादक)
हे पाहून तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी हा विषय शिर्डी देवस्थानमध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या वस्त्रसंहितेशी (‘ड्रेसकोड’शी) जोडला आहे. मंदिर प्रवेशाच्या सूत्रावर स्त्रियांवर अन्याय होत असल्याचा कांगावा करत आता तृप्ती देसाई यांनीही प्रसिद्धीझोतात येण्याचा प्रयत्न केला आहे. (मंदिरे ही चैतन्याचा स्रोत असल्याने त्यांचे पावित्र्यरक्षण होणे आवश्यक आहे; परंतु केवळ प्रसिद्धीसाठी हापापलेल्यांना हे कोण सांगणार ? – संपादक)
अभिनेत्री हेमांगी कवी यांनी २ दिवसांपूर्वी पोळ्या लाटतांनाचा स्वत:चा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला होता. यामध्ये त्यांचे स्तन उठून दिसत असल्याने सामाजिक माध्यमांवरून काहींनी त्यांना अंतर्वस्त्र परिधान करण्याचा सल्ला दिला, तर काहींनी त्यांच्यावर अर्वाच्च भाषेत टीकाही केली. याविषयी काही महिलांनी दूरभाष करून मारहाण करण्याची धमकी दिल्याचे, तसेच व्यवस्थित कपडे घालून व्हिडिओ प्रसारित करण्याचा सल्ला दिल्याचे हेमांगी कवी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. या प्रसंगानंतर हेमांगी कवी यांनी सामाजिक माध्यमांवर ‘बाई, बूब्स आणि ब्रा’ ही ‘पोस्ट’ प्रसारित करून महिलांना अंतर्वस्त्र परिधान करण्याविषयी स्वायत्तता हवी असल्याचे मत प्रकट केले. यामध्ये त्यांनी पुरुषांशी तुलना करत स्त्रियांनी अंतर्वस्त्र परिधान न करता दिसून येणार्या अवयवांची स्वत:ला आणि अन्यांना सवय लावून घेण्याचा सल्ला दिला आहे. (स्त्रीत्व हे नैसर्गिक असून तो काही पुरुष आणि स्त्री यांच्यातील न्यूनत्वाचा विषय नाही. त्यामुळे स्वत:च्या स्त्रीत्वाचा आदर कसा राखावा ? ते कसे पाळावे ? आणि त्यासाठी कोणता पोषाख असावा ? हे प्रत्येक सुसंस्कारित महिलेला समजते ! – संपादक)