परमबीर सिंह यांनी २ कोटी लाच मागितल्याचा आरोप !
मुंबई – येथील माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात राज्य सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मुक्त चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी त्यांच्यावर २ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला होता. त्यासमवेतच सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचेही अनेक गंभीर आरोप केले होते. त्यावरून राज्य सरकारने हे आदेश दिले आहेत.
अनुप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्या या मागणीच्या संदर्भात अतिरिक्त मुख्य सचिव सिंग (गृह विभाग) यांना पत्र लिहिले होते. सिंह यांनी स्वतःवर केलेल्या आरोपाचे खंडण केले होते. तत्पूर्वी गृहविभागाने तक्रारीच्या आधारावर चौकशीचे आदेश दिले होते; परंतु त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर प्रतिमास १०० कोटी रुपये वसुलीचे आरोप केले होते.
मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआयला) चौकशीचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी स्वतःचे त्यागपत्र मुख्यमंत्र्यांकडे सादर केले होते. राज्य सरकारने परमबीर सिंह यांच्या विरोधात दुसर्यांदा चौकशीचे आदेश दिले आहेत. यापूर्वी ‘अँटिलिया’ प्रकरणातील अन्वेषणात अपयशी ठरल्याच्या आरोपावरून गृह विभागाने त्यांच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले होते. त्यांना पोलीस आयुक्तपदावरून १७ मार्च या दिवशी हटवण्यात आले होते.