माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नीला ‘ईडी’चे समन्स !

मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर त्यांचा मुलगा ऋषिकेश आणि पत्नी सौ. आरती यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (‘ईडी’) ‘समन्स’ बजावण्यात आले  आहे. आरती देशमुख (वय ६६ वर्षे) यांना १५ जुलै या दिवशी सकाळी ११ वाजता ‘ईडी’च्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित रहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत’, अशी माहिती अनिल देशमुख यांचे अधिवक्ता कमलेश घुमरे यांनी १४ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. ‘आम्ही गुन्हा रहित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. ‘ईडी’कडून आलेल्या बातम्यांमध्ये विसंगती होती. सत्यता काय आहे ?, हे सांगण्यासाठीच पत्रकार परिषद घेतली आहे’, असेही ते म्हणाले.

अधिवक्ता कमलेश घुमरे पुढे म्हणाले की,…

१. आरती देशमुख यांना कोरोना झाला असून त्यांना अनेक आजारही आहेत. त्या गृहिणी असून त्यांचा या व्यवहाराशी काडीमात्र संबंध नाही.

२. माजी साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या प्रकरणात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्या ठिकाणी सचिन वाझे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात ४ कोटी ७० लाख रुपयांविषयी ते काही बोलत नाहीत. केवळ ‘जानेवारी मध्ये अनिल देशमुख यांना भेटलो आहे’, असे ते सांगत आहेत.

३. ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’ जेव्हा जबाब घेतात, तेव्हा त्यांचा माणूस तिथे असतो; मात्र आयोगासमोर मोकळ्या वातावरणात प्रतिज्ञापत्र दिले आहे. वाझे यांनी दबावाखाली येऊन अधिकार्‍यांसमोर जबाब दिलेला आहे. ‘सी.आर्.पी.सी’मध्ये पोलिसांसमोर दिलेला जबाब स्वीकारला जात नाही. १०० कोटी रुपयांचा आरोप खोटा आहे आणि बारची संख्याही विसंगत आहे.