‘आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून सनातन काही आयुर्वेदाच्या औषधांची निर्मिती करत आहे. या सेवेचे पूर्ण उत्तरदायित्व पू. वैद्य विनय भावे यांनी स्वतः उचलले होते. ‘सर्वत्रच्या साधकांना लवकरात लवकर उत्तम गुणवत्तेची आयुर्वेदाची औषधे मिळावीत’, अशी तीव्र तळमळ त्यांच्यामध्ये होती. त्यांना मधुमेह आणि हृदयासंबंधी विकार होता. त्यांची प्रकृती बरी नसायची; परंतु त्याही स्थितीत ते केवळ ‘साधकांसाठी औषधे बनवायला हवीत’, या एका ध्यासाने प्रतिदिन त्यांच्या घरापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या औषधनिर्मिती केंद्रामध्ये जाऊन औषधनिर्मितीमध्ये जातीने लक्ष घालायचे. आठवड्याला त्यांचा ५०० किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास व्हायचा. ‘औषधनिर्मिती’ हे व्रतच त्यांनी घेतले होते. आपत्काळाच्या दृष्टीने पूर्वसिद्धता म्हणून २०० हून अधिक आयुर्वेदाची औषधे बनवण्याचा त्यांचा मानस होता आणि त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्नही चालू केले होते.
कोरोना महामारीच्या काळामध्ये सर्वत्रच्या साधकांना उपयुक्त असे आयुर्वेदाच्या औषधांविषयीचे लेख त्यांनी लिहिले होते. त्यांच्या या लेखांप्रमाणे आचरण करून अनेक साधक बरे झाले. आयुर्वेदासंबंधी काहीही शंका असल्या, तरी पू. भावेकाका त्यांचे निरसन करत असत. पू. भावेकाका यांचा आम्हा वैद्यांना पुष्कळ आधार वाटायचा.
आयुर्वेदाच्या औषधांच्या निर्मितीसंबंधीच्या सेवेच्या निमित्ताने गेले काही मास मला पू. भावेकाकांचे सान्निध्य लाभले. या काळात त्यांच्याकडून केवळ औषधनिर्मितीच्या संबंधीच नव्हे, तर ‘चांगला साधक कसे व्हावे ?’, यासंबंधीही पुष्कळ सूत्रे शिकायला मिळाली. पू. भावेकाका म्हणजे निरपेक्ष प्रेमाचे सगुण रूप होते. त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर आम्हा वैद्य साधकांची वाटचाल निरंतर होण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव राहू दे, ही त्यांच्या चरणी प्रार्थना !’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.६.२०२१)