‘महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा’च्या कोकण विभागाच्या वतीने पत्रकारांना विविध साहित्यांचे वाटप

पत्रकारांना वस्तूंचे वाटप करतांना डावीकडून किशोर पाटील

ठाणे, १३ जुलै (वार्ता.) – पत्रकार वृत्तसंकलन करत असतांना मोठी जोखीम पत्करून काम करत असतात. अशा वेळी त्यांना साहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कोकण विभागाच्या वतीने ‘मास्क’, ‘सॅनिटायझर’, ‘रेनकोट’, ‘डायरी’, ‘पेन’, ‘शर्टपिस’ अशा विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. ‘अजून कोरोना संपलेला नाही, त्यामुळे पत्रकारांनी स्वत:ची काळजी घेऊन वार्तांकन करावे’, हा संदेश दिला आहे, ‘महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा’चे कोकण विभागाचे सरचिटणीस आणि ‘दैनिक स्वराज तोरण’चे संपादक किशोर पाटील यांनी सांगितले.

भिवंडी येथील कैलासनगर भागातील वळपाडा गावातील ‘दैनिक स्वराज्य तोरण’च्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. ‘महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा’चे कोकण विभाग सरचिटणीस किशोर पाटील यांच्या वतीने आणि भोकरी गावाचे समाजसेवक श्री. रामचंद्र देसले, भाजपच्या ठाणे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष श्रीधर पाटील आणि समाजकल्याण न्यासाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सोन्या पाटील यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम पार पडला.

भिवंडी तालुक्यातील ५० हून अधिक पत्रकारांना या वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्या वेळी आर्.एस्.पी. या संघटनेकडून ज्येष्ठ पत्रकारांना कोरोना काळात उत्तम काम केल्याविषयी कोरोना काळातील देवदूत म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

या वेळी संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष कुंडलिक कानगुडे, भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील, आर्.एस्.पी.चे मणीलाल शिंपी, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काबाडी, तसेच अन्य पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राजेंद्र पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन आयोजक किशोर पाटील यांनी केले.