जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरणी अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार ! – सदाभाऊ खोत, नेते, रयत क्रांती संघटना

सदाभाऊ खोत

मुंबई – सातारा जिल्ह्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यासमवेत सहकारी क्षेत्रात झालेल्या घोटाळा प्रकरणाची चौकशी करावी, अशा मागणीचे पत्र केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे देणार आहोत. जरंडेश्वर साखर कारखान्यावर झालेल्या कारवाईनंतर ऊस कुठे घालायचा ?, असा प्रश्न तेथील शेतकर्‍यांना पडला आहे. या कारखान्यावर प्रशासक नियुक्त करून शेतकर्‍यांची होणारी हानी थांबवावी, अशी मागणी माजी मंत्री आणि ‘रयत क्रांती संघटने’चे नेते सदाभाऊ खोत यांनी १३ जुलै या दिवशी केली आहे.

ते पुढे म्हणाले की, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे व्यवहार राज्य शिखर बँकेकडून झाले होते. शेकडो कोटी रुपये किमतीच्या ५५ सहकारी साखर कारखान्यांची विक्री कवडीमोल भावाने झाली. या कारखानदारांनी दिवसाढवळ्या शेतकर्‍यांच्या घरावर दरोडा टाकला. यात राज्याचे १ सहस्र २०० कोटी रुपयांचे भाग भांडवल अडकले आहे. हे कारखाने पुन्हा सहकारी होणे आवश्यक आहे. या कारखान्याच्या संदर्भात झालेल्या खरेदी-विक्री व्यवहाराची चौकशी झाली पाहिजे.