मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
भ्रष्टाचाराने पोखरलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय !
संभाजीनगर – वाहन परवाना नूतनीकरणासाठी १८ सहस्र रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात धाड टाकून साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने आणि त्यांचा खासगी सहकारी दलाल अभिजित पवार या दोघांना अटक केली. शहरातील बजरंग चौक येथील एका वाहन शिकवणार्या चालकाने केलेल्या तक्रारीनंतर १२ जुलै या दिवशी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
विशेष म्हणजे तक्रारदाराने प्रथम संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती; मात्र विभागातील अधिकार्यांनी या तक्रारीची नोंद घेतली नाही. त्यामुळे तक्रारदाराने मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. मुंबई येथील पथक येऊन ही कारवाई करण्यात आली. पथकाने पवार यांच्या वाहनातून काही महत्त्वाची कागदपत्रे आणि मुद्रांक जप्त केले असून माने यांच्या घराची झडतीही घेतली आहे. (यावरून संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात भ्रष्ट कारभार कसा चालू आहे, हे लक्षात येते. या प्रकरणाची पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी गंभीर नोंद घेऊन तक्रारीची नोंद न घेणार्या संबंधित अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी. – संपादक)