चंद्रपूर – शहरातील दुर्गापूर येथे वीज नसल्यामुळे वातानुकुलित यंत्र (एसी) चालवण्यासाठी लावलेल्या विद्युत् जनित्रामधून (जनरेटर) झालेल्या कार्बन डायऑक्साईड या विषारी वायूच्या गळतीमुळे कंत्राटदार रमेश लष्कर यांच्या कुटुंबातील ६ जणांचा झोपेतच गुदमरून मृत्यू झाला आहे, तर एकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. रात्री वीज नसल्याने रमेश लष्कर यांनी विद्युत् जनित्र लावले होते. सकाळी लष्कर यांच्या घरातून धूर निघत असल्याचे दिसताच परिसरातील लोकांनी आरडाओरडा करत पोलिसांना बोलावले. पोलिसांनी लष्कर यांच्या घराचा दरवाजा तोडून घरातील सदस्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले; मात्र तिथे आधुनिक वैद्यांनी ६ जण मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. अजय लष्कर, रमेश लष्कर, लखन लष्कर, कृष्णा लष्कर, पूजा लष्कर आणि माधुरी लष्कर, अशी मृत झालेल्यांची नावे आहेत.