पंढरपूर (सोलापूर) – आषाढी वारीच्या वेळी पंढरपूरसह १२ गावांत १७ ते २५ जुलैपर्यंत ९ दिवस प्रशासनाने संचारबंदी घोषित केली आहे. त्याला लोकप्रतिनिधी आणि व्यापारी यांचा विरोध होत असल्याने समन्वयाने मार्ग काढू, तसेच संचारबंदीचा कालावधी न्यून करण्याविषयी येत्या २ दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासन सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या संत तुकाराम भवन येथे दत्तात्रय भरणे यांनी आषाढी वारीच्या नियोजनाविषयी सर्व संबंधित विभागप्रमुखांची बैठक घेतली. त्या वेळी हे आश्वासन दिले. या वेळी भाजपचे आमदार प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, नगराध्यक्षा साधना भोसले, पंढरपूर मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.