हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के बसले !

भूकंपामुळे घराची झालेली पडझड

हिंगोली – जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसर, औढा नागनाथ आणि हिंगोली तालुका येथे ११ जुलै या दिवशी सकाळी ८.४५ वाजता ४.४ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले. या दोन्ही तालुक्यांत नेहमीच अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवतात. आतापर्यंतच्या जाणवलेल्या भूकंपांच्या धक्क्यांपैकी यंदाचा धक्का सर्वाधिक होता, असे ग्रामस्थांनी सांगितले. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नांदेड – जिल्ह्यात ११ जुलै या दिवशी सकाळी ८.३० वाजता ४.४ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर म्हणाले की, मी शेजारी असलेल्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि मुख्यालय यांच्याशी संपर्कात असून जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही असेच आवाहन केले आहे.