कोरोनावरील उपचारांसाठीची यंत्रणा उभारण्यासाठी शिर्डी संस्थानचे साहाय्य घेणार ! |
|
नगर – शिर्डी संस्थानवर नव्या विश्वस्तांची नियुक्ती होताच काही जण याविषयीच्या कायद्याचा आधार घेऊन न्यायालयात याचिका प्रविष्ट करतात. त्यामुळे न्यायालयीन लढाई दीर्घकाळ चालू रहाते. यासाठी राज्य सरकारने शिर्डी संस्थानवर विश्वस्तांची नियुक्ती करण्याच्या कायद्यात सुधारणा केल्या आहेत, अशी माहिती राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. अधिवेशनात संमत झालेल्या या विधेयकावरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यानुसार ३१ जुलैपर्यंत नवे विश्वस्त मंडळही नियुक्त केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुश्रीफ पुढे म्हणाले की, कोरोनाच्या तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी शिर्डी संस्थानचे साहाय्य होऊ शकले नाही. विस्ताराने मोठ्या असलेल्या नगर जिल्ह्याचा सर्व भार नगरच्या जिल्हा रुग्णालयावर येऊ नये, यासाठी आम्ही शिर्डी संस्थानच्या साहाय्याने कोरोनावरील उपचारांसाठीची यंत्रणा उभारण्याचे ठरवले होते. त्यासाठी प्रस्ताव सिद्ध केला होता; मात्र संस्थानचे कामकाज सध्या न्यायालयाच्या अनुमतीने करावे लागत आहे. आम्ही साहाय्यासाठी अनुमती मागितली असता न्यायालयाने आम्हाला आधी नवे विश्वस्त मंडळ नियुक्त करण्याची सूचना दिली. त्यामुळे कोरोनावरील उपचारांसाठीची यंत्रणा उभारण्याचे काम आता जुलै मासानंतर मार्गी लागेल.