महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी १० ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे नोंद !

पिंपरी – महापालिकेची विविध कामे घेताना बनावट (एफ्.डी.आर्.) कायम ठेव आणि बँक गॅरंटी देऊन महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी १० ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे नोंद केले आहेत. त्यांच्यासह १८ ठेकेदारांना निविदा भरण्यास प्रतिबंध करून ४ वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले आहे. यातील कावेरी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटच्या वतीने संतोष किरनळ्ळी यांनी महापालिकेच्या प्रकल्प सल्लागार समितीवर नेमणूक मिळवली होती. त्यासाठी त्यांनी सादर केलेले काम केल्याच्या अनुभवाचे प्रमाणपत्र खोटे असल्याचे आढळून आल्याने त्यांनाही काळ्या यादीत टाकून फौजदारी गुन्हा नोंद करण्याचा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे. महापालिकेच्या निविदा प्राप्त करतांना १० टक्क्यांहून अल्प दर असलेल्यांना कामे दिली जातात. प्रत्येक अल्प दरासाठी अनामत रक्कम, बँक गॅरंटी किंवा कायम ठेव (एफ्.डी.आर्.) भरून घेतल्यानंतर कामांना अनुमती दिली जाते; मात्र गेल्या काही दिवसांत बनावट बँक गॅरंटी किंवा एफ्.डी.आर्. सादर करून महापालिकेची फसवणूक केल्याचे आयुक्त राजेश पाटील यांच्या निदर्शनास आल्याने ही कारवाई केली.