धमकीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित !
अमरावती – जिल्ह्यातील मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी आदिवासींच्या मागणीसंदर्भात निवेदन देणार्या तरुणांना धमकी दिल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. नंदुरबार येथील काही आदिवासी तरुण ‘सरकारने आदिवासी लोकांची कशी हानी केली, बनावट आदिवासींनी खर्या आदिवासींच्या जागा बळकावल्या आहेत, तसेच मेळघाटमधील तरुणांना त्यांच्या शिक्षणाचा काहीच लाभ झाला नाही’, असे आमदार पटेल यांना सांगितले. या वेळी आमदार पटेल यांचा पारा चढला. त्यांनी या तरुणांना ‘अधिक बोलू नका, निवेदन द्या आणि निघून जा’, असे सांगितले. पटेल आणि तरुण यांच्यात वादावादी झाली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. (लोकप्रतिनिधी जर असे वागू लागले, तर विश्वासार्हता अल्प होऊन वाद वाढू शकतो. – संपादक)
याविषयी आमदार पटेल म्हणाले, ‘‘मेळघाटमधील कुठलेही आदिवासी आले, तर त्यांच्या समस्या जाणून घेईन; परंतु नंदुरबार येथून आलेले तरुण मला उलटसुलट बोलत होते. त्यामुळे मी त्यांचे सहन करू का ? अन् त्यांची आरती करू का ? या तरुणांनी विश्रामगृहात जाऊन माझ्या विरोधात काही व्हिडिओ बनवल्याने त्याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.’’